कुडाळ पोलिसांच्या तत्परतेने रशियन नागरिकाला मिळाली हरवलेली बॅग

Edited by:
Published on: December 11, 2023 15:39 PM
views 221  views

कुडाळ : रशियन नागरिकाची हरवलेली बॅग कुडाळ पोलिसांनी शोधून दिल्यामुळे रशियन नागरिकांनी कुडाळ पोलिसांचे आभार मानले आहेत. तर कुडाळ शहरात कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला व व पोलीस हवालदार अनिल पाटील अमोल बंडगर यांचं कौतुक होत आहे.

हि घटना अशी की, रविवारी 10 डिसेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास मंगला एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या रशियन नागरिकाचा मोबाईल कुडाळ रेल्वे स्थानकाच्या पुढे गेल्यानंतर हातातून पडला, व ट्रेन झारापच्या पुढे गेली असता त्या रशियन नागरिकाने ट्रेनची एमर्जेंसी चैन खेचून ट्रेन थांबविली व आपली बॅग घेऊन दुपारी तीनच्या सुमारास या रशियन नागरिकाने कुडाळच्या दिशेने पायपीट सुरू करत आपला मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र खांद्यावरील बॅगेचे वजन जास्त झाल्याने याच दरम्यान त्याने ही बॅग रेल्वे ट्रॅक नजीक ठेवली. व पुन्हा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न सुरू केला.

मात्र, सात तासाची पायपीट केल्यानंतरही मोबाईल आढळून आला नाही व बॅग ठेवलेले ठिकाणही आठवत नसल्याने यावेळी या नागरिकाने ट्रॅक वरून रस्त्यावरती धाव घेत एका दुचाकीच्या सहाय्याने रविवारी रात्री दहा वाजता कुडाळ पोलीस स्टेशन गाठले. यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी पोलीस हवालदार अनिल पाटील व पोलीस हवालदार अमोल बंडगर यांना दुपारी ज्या ठिकाणी मंगला एक्सप्रेस या रशियन नागरिकांनी थांबवली तेथून उलट्या दिशेने नागरिकाची बॅग व मोबाईल शोधण्याकरिता त्या रशियन नागरिकांसोबत पाठवले यावेळी पोलीस अंमलदार यांनी रात्रीच्या वेळी रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी शोध घेऊन रशियन नागरिकास त्याची हरवलेली प्रवासी बॅग मिळवून दिली.

बॅग मिळताच रशियन नागरिकाला रडू आवरता आले नाही कारण या बॅगमध्ये त्याचा पासपोर्ट विजा यासह आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे दस्तऐवज होते. त्यामुळे बॅग मिळाल्यामुळे या रशियन नागरिकाने कुडाळ पोलिसांचे आभार मानले. तर कुडाळ पोलिसांनी या दाखवलेल्या तत्परतेबद्दल कुडाळ शहरात कुडाळ पोलिसांचे कौतुक होत आहे.