
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथील रिक्षा चालकांच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या तीस वर्षांपासून एकसंध असलेल्या रिक्षा युनियनमध्ये आता उभी फूट पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अध्यक्ष यांच्या 'मनमानी' कारभाराला कंटाळून परशुराम परब यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच ओरोसमध्ये दोन स्वतंत्र रिक्षा युनियन अस्तित्वात येणार आहेत.
परशुराम परब यांनी आपली भूमिका मांडताना विद्यमान नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. ओरोस रिक्षा स्टँडवर रिक्षा लावताना चालक-मालकांना अत्यंत जाचक अटींना सामोरे जावे लागत आहे. या अटींमुळे सामान्य रिक्षा चालकांमध्ये असंतोष होता. अध्यक्ष यांच्या कार्यपद्धतीमुळे रिक्षा चालकांचे प्रश्न सुटण्याऐवजी वाढत असल्याचे सांगत, परब यांनी विभाजनाचा मार्ग निवडला आहे.
या नव्या गटाला ओरोस, सुकळवाड, कसला, रानबांबुळी परिसरातील रिक्षा चालकांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे. या पाठिंब्यामुळे परशुराम परब यांचे बळ वाढले असून, नवीन युनियनच्या स्थापनेसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.
नव्याने स्थापन होणाऱ्या युनियनमध्ये रिक्षा चालकांना सभासद करण्यासाठी परशुराम परब यांनी मोठी घोषणा केली आहे. या युनियनमध्ये केवळ सभासद फी भरून नोंदणी करून सभासदत्व दिले जाणार आहे. या निर्णयामुळे जुन्या युनियनमधील अनेक चालक नव्या गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
"अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला आहे. रिक्षा चालकांना सन्मानाने आणि विनाअट व्यवसाय करता यावा, हाच आमचा उद्देश आहे.", अशी प्रतिक्रिया परशुराम परब यांनी व्यक्त केली. तीस वर्षांची परंपरा असलेल्या या युनियनमधील या विभाजनामुळे ओरोसच्या रिक्षा व्यवसायात कोणते पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.










