
दापोली : राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही पुणे येथे एक प्रशिक्षण अकादमी सुरू करणार असून राज्याच्या विविध भागांमध्ये ४ विभागीय अकादमी सुरू केल्या जाणार आहेत. यापैकी एक अकादमी ही दापोली तालुक्यातील वाघवे येथे रॉयल गोल्डफिल्ड संकुलात सुरू होणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी केली.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रिमियर लीग व वुमन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग या स्पर्धांचे आयोजन लवकरच करण्यात येणार असून या लीगच्या वेळापत्रकासंदर्भात माहिती देण्यासाठी रॉयल गोल्डफिल्ड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार म्हणाले की, महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही गेल्या काही वर्षात बदलत चालली असून या संघटनेच्या अंतर्गत येणाऱ्या २१ जिल्ह्यामधील गुणवंत क्रिकेटपटूंचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. स्थानिक पातळीवर या खेळाडूंना आवश्यक ते प्रशिक्षण मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन संघटनेच्या वतीने पुणे येथे अजय शिर्के यांच्या नावे क्रिकेटचे प्रशिक्षण देणारी एक मुख्य अकादमी आम्ही लवकरच सुरू करत आहोत. ही अकादमी सुरू करत असतानाच विभागीय पातळीवरही आमची नजर असणार आहे. त्यातून आम्ही छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे विभागीय अकादमी सुरू करणार आहोत.
या अकादमीमध्ये विभागीय जिल्ह्यातून होतकरू खेळाडूंना त्यांच्या गटानुसार बोलावले जाईल व तज्ञ प्रशिक्षकांकडून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. दापोली तालुक्यातील वाघवे येथे रॉयल गोल्डफिल्ड येथील संकुलात क्रिकेटच्या अकादमीसाठी असणाऱ्या अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. या संकुलाचे मालक अनिल छाजेड हे स्वतः क्रिकेटप्रेमी असल्याने त्यांनी कमी बजेटमध्ये त्यांची अकादमी क्रिकेटपटूं साठी उपलब्ध करून दिली आहे. या संकुलात चांगले ग्राउंड आहे. खेळाडूंची राहण्याची व्यवस्था उत्तम असून स्विमिंग पूल व जीम उपलब्ध आहे. भविष्यात इनडोअर स्टेडियम ते उपलब्ध करून देणार असून बॅटींग व बॉलिंग पीच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दापोलीमध्ये भविष्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सामने खेळविण्याचा आमचा मानस असून बीसीसीआयच्या गाईडलाईननुसार जर तीन खेळपटया उपलब्ध झाल्या तर रणजी व अन्य फॉरमॅटमधील सामने दापोलीत खेळविण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने आज आपण स्थानिक लोकप्रतिनिधी राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्याजवळ चर्चा केली असून त्यांनीही सकारात्मक तयारी दर्शविली आहे. दापोलीमध्ये कृषी विद्यापीठाचे मैदान व आझाद मैदान याची पाहणी आपण केली असून स्थानिक पातळीवर रत्नागिरी जिल्हा असोसिएशन या सर्वांच्या संपर्कात राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. क्रिकेटच्या प्रसारासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नेहमीच प्रयत्नशील राहिली असून आमच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याला ७५ लाखाचा निधी हा मुलभूत सोयीसुविधांसाठी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.