'केर' गावात सापडली दुर्मिळ प्रजातीतील 'ड्रॉसेरा बर्मानी’ कीटकभक्षी वनस्पती

Edited by:
Published on: February 16, 2025 19:49 PM
views 191  views

दोडामार्ग : 'केर' येथील निसर्ग अभ्यासक तुषार देसाई हे 'वनश्री फाउंडेशन सिंधुदुर्ग ' संस्थेमार्फत आयोजित पक्षीनिरीक्षणासाठी फीरत असताना या दूर्मिळ वनस्पतीचे दर्शन त्यांना झाले.  निसर्ग रूपी अशाच एका विस्मयकारक गोष्टीचा साक्षीदार होण्याची संधी लाभली असे ते म्हणाले. ड्रोसेरा प्रजाती ही एक लुप्तप्राय मांसाहारी वनस्पती असुन या वनस्पतीचा उपयोग हर्बल औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. 

वनस्पती स्वत:चे अन्न हरितद्रव्याच्या सहाय्याने तयार करतात, परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि ते अन्न काही वनस्पतींना कीटक वा अन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या शरीरातून मिळवावे लागते. अशा कीटकभक्षक वनस्पतींच्या सुमारे ६२५ जाती असून, त्यांपैकी ३०-३५ जातींच्या वनस्पती भारतात सापडतात. महाराष्ट्रात फक्त पाच-सहा जातींच्या वनस्पती आढळतात. या सर्व वनस्पतींना ‘मांसाहारी वनस्पती’ असेही म्हणतात. या वनस्पती जमिनीवर, पाण्यात किंवा दोन्ही ठिकाणी आढळणाऱ्‍या असतात; परंतु बहुतेक कीटकभक्षक वनस्पती दलदलीच्या किंवा वाळवंटी भागांत आढळतात. ज्या ठिकाणी थोडाच नायट्रोजन असतो, तेथे त्या वनस्पतींची विशिष्ट प्रकारे वाढ होते.

महाराष्ट्रात सापडणाऱ्‍या कीटकभक्षक वनस्पतींमध्ये ड्रॉसेरा प्रजातीतील वनस्पतींच्या दोन प्रजाती उपलब्ध आहेत. ड्रॉसेरा इंडिका आणि ड्रॉसेरा बर्मानी. तिसरी जात ड्रॉसेरा पेल्टेटा ही महाराष्ट्राबाहेर काही थंड हवेच्या ठिकाणी सापडते. ड्रॉसेरा इंडिका ही पश्चिम घाटात खंडाळा, महाबळेश्वर आदी भागांत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाहावयास मिळते. ड्रॉसेरा बर्मानी ही दक्षिण कोकणात नदीच्या पात्राच्या बाजूस व भातशेतात पावसाळ्यानंतर सापडते. आता 'केर ' गावात मांसाहारी वनस्पती सापडल्याने येथील जैवविविधता वैभव परत एकदा अधोरेखित झाले आहे.