
मालवण : मालवण तालुक्यात भाजपामध्ये मातब्बर नेते आहेत. आपल्याकडील माणसं आणतातच पण वेळ पडली तर विरोधकांची 50 माणसं आणणारी माणसं मालवणात आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा निधीच्या बाबतीत झुकत माप देऊ अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. प्रथमच मालवणात आलेल्या मंत्री नितेश राणे यांचा यावेळी मालवण भाजपच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत मालवण तालुक्यातील सदस्यता नोंदणीचा आढावा घेण्यासाठी भाजपा नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सायंकाळी मालवणला भेट दिली. यावेळी भाजपा कार्यालय येथे मंत्री नितेश राणे यांचे स्वागत करण्यात आले. सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा यावेळी राणे यांनी घेतला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, सदस्यता मोहीम संयोजक राजू परुळेकर, बाबा मोंडकर, विलास हडकर, सुदेश आचरेकर, अजिंक्य पाताडे, ललित चव्हाण यासाह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, 12 जानेवारीला भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन आहे. त्या अधिवेशनात सदस्य नोंदणीचा आढावा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा घेणार आहेत. मालवण तालुका हा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे सदस्य नोंदणीत मालवण तालुक्याने आघाडी घेतली पाहिजे. जेवढे जास्त सदस्य नोंदणी होईल तेवढा निधीच्या बाबतीत झुकत माप दिल जाईल. खासदार नारायण राणे यांनीही व्हिडीओ द्वारे सदस्य नोंदणीचे आवाहन केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
निलेश राणेंवर भाजपचाही तेवढाच अधिकार
या मतदार संघात महायुतीचा जरी आमदार असला तरी आमदार निलेश राणे यांच्यावर भाजपाचाही तेवढाच हक्क आहे. आम्ही भाजपामध्येच आहोत. त्यामुळे अजून अर्धा टक्का आपलाच हक्क आहे असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.