
सिंधुदुर्ग : बँकेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला बँकेबद्दल निष्ठा, प्रेम व आपुलकी वाटली पाहिजे. बँकींग सेवा देत असतांना आपण एकाच कुटुंबाचे घटक असून ग्राहकांना बँकींग विषयक सेवा देत असतांना सकारात्मक दृष्टी ठेवली पाहीजे. भविष्यात बँकींग व्यवसायात प्रगती साधावयाची असेल तर डिजीटल पर्यायांचा वापर करणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेने माहे डिसेंबर २०२४ अखेर ६००० कोटी व्यवसायाचा टप्पा पार पाडला असून येत्या डिसेंबर २०२६ अखेर ८००० कोटी व्यवसायाचा टप्पा सिंधुदुर्ग जिल्हा बँक निश्चित गाठणार असल्याचा ठाम विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केला. शरद कृषी भवन येथे आयोजित बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
रविवार, दि. २ मार्च २०२५ रोजी शरद कृषी भवन येथे बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचेशी संवाद साधून विचारांची देवाण-घेवाण व्हावी व दैनंदिन कामकाजामध्ये येणारा ताणतणाव कमी व्हावा यासाठी हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सचे निवृत्त ज्येष्ठ अधिकारी एकनाथ बिरारी यांनी बँक कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना डिजीटल बँकींग व ग्राहक सेवेबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दीपप्रज्वलन करुन केले. तसेच या वेळी झालेल्या संवाद कार्यक्रमात शाखांकडील दैनंदिन कामकाजाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेत अध्यक्ष महोदयांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात बँकेच्या शाखांच्या ठेव उद्दीष्ट तसेच डिजिटल बँकींग व्यवहाराच्या अनुषंगाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाखांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर,संचालक गजानन गावडे,प्रकाश मोर्ये, रवींद्र मडगावकर,विद्याधर परब.विद्याप्रसाद बांदेकर आत्माराम ओटवणेकर मेघनाथ धुरी,सौ नीता राणे, सौ प्रज्ञा ढवण,व्हीक्टर डान्टस, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा स्नेहमेळावा आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.