12 मिनिटात एकाच आकाराच्या जास्तीत जास्त बनवा चपात्या

कोकणात प्रथमच जानकी हॉटेलच्या विनय गांवकर यांची अभिनव संकल्पना
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 12, 2022 19:22 PM
views 1118  views

मालवण : जानकी हॉटेलच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य साधून जानकी हॉटेल कुंभारमाठ मालवण व रोटरी क्लब मालवण यांच्यावतीने ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात आगळी वेगळी अशी चपाती बनविण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 12 मिनिटात जास्तीत जास्त चपात्या आणि एकाच आकारात बनविण्याची ही स्पर्धा आहे.



जानकी हॉटेल मालवण व रोटरी क्लब मालवण यांनी जानकी हॉटेलची रौप्य महोत्सवी वर्षाची परिपूर्ती याचे औचित्य साधून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अनुषंगानेच जानकी हॉटेलचे मालक रो. विनय गांवकर यांच्या संकल्पनेतून मालवण तालुका ग्रामीण भाग मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजना करण्यात आले आहे. यात पहिल्या फेरीमध्ये चपाती बनविण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या कला गुणांना वाव देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून यातूनच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या दृष्टीकोनातून जानकी हॉटेल मालवण व रोटरी क्लब मालवण यांनी वाटचाल सुरु केली आहे.

चिंदर गावातून या स्पर्धेला  सुरुवात झाली आहे. या गावामध्ये 25  स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 3 फेरीमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यात राजश्री राजेंद्र कोदे यांनी प्रथम क्रमांक पटकावीला. तर किरण कृष्णा वराडकर द्वितीय आणि श्रीम. तृप्ती एकनाथ हडकर यांनी तृतीय क्रमांक पटकावीला. त्यानंतर हडी गावामध्ये दुसरी स्पर्धा घेण्यात आली. यात 16 स्पर्धकांनी सहभाग घेतला. 2 फेरीमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सौ. निधी लक्ष्मण कावले, दिव्या दिनेश साळकर या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या.

तालुक्यातील नियोजित सर्व गावातील स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर विजेत्या स्पर्धकांची अंतिम फेरी जानकी हॉटेल कुंभारमाठ येथे घेण्यात येणार आहे. तालुक्यातील आणि अंतिम फेरीसाठी स्पर्धेला लागणारे सर्व साहित्य जानकी हॉटेलच्या वतीने देण्यात येणार आहे. अशी माहिती स्पर्धेचे आयोजक जानकी हॉटेलचे मालक रो. विनय गावकर यांनी दिली.