किरकोळ वादाचं रूपांतर मारामारीत..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 11, 2024 14:25 PM
views 479  views

कणकवली : नागवे रोडवरील माऊली नगर येथे दुचाकी व ओमनी कार मध्ये किरकोळ अपघात झाला. यादरम्यान दुचाकी व ओमनी चालक यांच्या झालेल्या वादाचे रुपांतर एकावर कटरने तर दुसऱ्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघांच्याही परस्परविरोधी तक्रारीवरून कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चालकाच्या तक्रारीवरून ओमनी चालक महेंद्र गोपाळ चव्हाण (४३, रा. माऊली नगर) तर ओमनी चालकाच्या तक्रारीवरून दुचाकी चालक गौतम धरमचंद्र हिंदळेकर (३०, रा. सिद्धार्थ नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

दुचाकी चालक गौतम हिंदळेकर यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नागवे रोडवर फिर्यादी गौतम हिंदळेकर दुचाकीने जात असताना समोरुन येणाऱ्या ओमनी कारने हुल दिली. यात ओमनीचा आरसा हिंदळेकर याच्या खांद्याला लागल्याने अपघात झाला. त्याबाबत हिंदळेकर यांनी तुला दिसत नाही का? अशी विचारणा केली. त्याचा ओमनी चालक महेंद्र चव्हाण यांना त्याचा राग आल्याने हातातील कटरने गौतम हिंदळेकर याच्या छातीवर, पायावर, मांडीवर वार  केले. गौतम धरमचंद्र हिंदळेकर यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमी असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

तर ओमनी चालक महेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महेंद्र चव्हाण ओमनी जात असताना गौतम हिंदळेकर याने आपल्या ताब्यातील दुचाकी चुकीच्या बाजूने चालवत ओमनी च्या समोर आले त्यामुळे अचानक गाडी थांबवली त्यामुळे महेंद्र चव्हाण यांनी गौतम हिंदळेकर याला समोर येणारी गाडी दिसत नाही का असे विचारणा केली असता गौतम हिंदळेकर याला त्याचा राग आल्याने त्याने शिवीगाळ करत हाताच्या ठोशाने व लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच बाजूला असलेला दगड उचलून उजव्या खांद्यावर मारून दुखापत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. महेंद्र चव्हाण याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.