तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली झाली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक

'त्या' युवकांच्या कुटुंबियांना शासकीय सेवेत सामावून घ्या : मंगेश तळवणेकर
Edited by: विनायक गावस
Published on: October 12, 2023 15:52 PM
views 196  views

सावंतवाडी : माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांच्या मागणीनुसार तहसील कार्यालय सावंतवाडी येथे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकारी व सामाजिक संघटनांची बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी नगरपरिषद व महावितरणला शहरातील धोकादायक व जीर्ण झाडांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तर काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आंजिवडेतील पंदारे  युवकांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही तहसीलदार पाटील यांनी दिली. यावेळी शासकीय मदतीसह मृत दोघा युवकांच्या कुटुंबातील सदस्यांना नगरपरिषद व महावितरणने शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अन्यथा जबाबदारी झटकणाऱ्या  शासनाला जाग आणण्यासाठी शेतकरी संघटनेला तहसिलदार कार्यालयावर भव्य मोर्चा आणावा लागेल असा इशारा मंगेश तळवणेकर यांनी दिला. तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

सावंतवाडी शहरात भेडले माड पडून आंजिवडे- गवळीवाडी येथील राहुल पंदारे व संभाजी पंदारे या दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला होता. यात त्या मुलांची चुक नसताना हकनाक बळी गेल्यामुळे शासनाने त्याच्या कुटुंबियांना भरीव मदत द्यावी व त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना  नगरपरिषद व महावितरणने शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी केली होती. तर प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांंची बैठक घेऊन तहसिलदारांनी सुचना द्याव्यात अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद, महावितरण, वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मंगेश तळवणेकर यांनी पंदारे कुटुंबाला शासनाकडून प्रत्येकी ५० लाख रुपये मदत मिळवून द्यावी तसेच दोघांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रशासकीय सेवेत रुजू करून घेण्यात यावे अस मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे शहरासह रस्त्याच्या बाजूला असलेली धोकादायक झाड हटविण्यात यावी जेणेकरून अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी दक्षता घ्यावी अशी मागणी केली. याप्रसंगी धोकादायक अवस्थेतील झाडांच सर्वेक्षण करून ती हटविण्यात यावी अथवा त्यावर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, खासगी जागेतील झाडांबाबत संबंधित जागा मालकांना नोटीस बजावावी 

असे आदेश तहसीलदार श्रीधर पाटील यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिले. तर महावितरणला देखील लाईनवरी झाडांबाबतचा अहवाल देण्याचे आदेश त्यांनी दिलेत. भविष्यात अशा आपत्कालीन घटनांपासून जीवितहानी होणार नाही यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करावे असे तहसीलदार म्हणाले‌. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेन आपला अहवाल सादर करत असताना शहरातील धोकादायक झाडांचं सर्वेक्षण करून ती हटविण्याच काम सुरू असल्याचे उद्यान पर्यवेक्षक गजानन परब यांनी सांगितले. तर सर्वेक्षणानंतर नगरपरिषदेला वनविभागाच्यावतीन सहकार्य करण्यात येईल असं मदन क्षीरसागर यांनी सांगितलं. दरम्यान, प्रशासनाकडून पंदारे कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे तहसिलदार कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाच्या इशाऱ्याबाबत विचार करावा असं आवाहन मंगेश तळवणेकर यांना करण्यात आले‌‌. 

यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, उद्यान पर्यवेक्षक गजानन परब, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता के. एच. चव्हाण, प्रशासकीय अधिकारी श्री.अंधारे, सार्वजनिक बांधकामचे जेई ईश्वर बामणे यांसह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.


 पंदारे कुटुंबीयांना शासकीय सेवेत सामावून घ्या : मंगेश तळवणेकर

या बैठकीनंतर बोलताना सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर म्हणाले, पंदारे कुटुंबावर कोसळेला दुःखाचा डोंगर मदतीतून भरून येणारा नाही. कर्ती,कमवती मुलं गेल्यान  कुटुंबिय धक्का सहन करू शकलेले नाहीत. पंदारे कुटुंबाला शासनाकडून मदत देण्यासह त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. शालेय शिक्षणमंत्री आ. दीपक केसरकर यांनी पंदारे कुटुंबाला मदत मिळवून देण्याच आश्वासन दिले आहे. त्याप्रमाणे त्यांनी पंदारे कुटुंबाला आधार द्यावा असं मत तळवणेकर यांनी व्यक्त केले.