कमाल एकीची | तब्बल २२ वर्षांनी दोडामार्ग शहरातील अंगणवाडीत पोहचली वीज

गावकऱ्यांनी सरकारच्या नाकावर टिच्चून अशक्यही केलं शक्य
Edited by: संदीप देसाई
Published on: July 13, 2023 20:27 PM
views 163  views

दोडामार्ग : 'गाव करील ते राव काय karil' हे सर्वश्रुत आहे. अशीच किमया दोडामार्ग शहरातील सावंतवाडा येथील पालक व ग्रामस्थांनी करून दाखवलीय. शासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे पावसात अंधारात आणि उन्हाळ्यात उकाड्यात चिमुकल्यांना होणाऱ्या त्रासापासून या ग्रामस्थांच्या एकीने मुक्त केलंय. तालुका ठिकाण असलेल्या दोडामार्ग शहरातील सावंतवाडा या अंगणवाडीत एक दोन नव्हे, तर तब्बल २२ वर्षे वीजच नव्हती. मात्र सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर ११ जुलै २०२३ रोजी यश आले. २२ वर्षांनी चिमुकल्यांच्या जीवनात अंधारात अर्जुन प्रकाश देत मुलांचे भवितव्य घडविणाऱ्या अंगणवाडी इमारत अखेर विजेच्या प्रकशान प्रकाशमान झाली. त्यामुळे पालक, शिक्षकवर्गातून मोठं समाधान व्यक्त होत आहे.

सावंतवाडा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते समीर रेडकर हे काही कामानिमित्त अंगणवाडीत गेले होते. त्यावेळी अंगणवाडी शिक्षिका उज्ज्वला कुबल यांनी अंगणवाडीत विजच नसल्याचे बाब त्यांच्या कानावर घातली. या अंगणवाडीत एक दोन नव्हे तर  एकूण २३ मुले  अ, आ, ई चे धडे घेत आहेत. मात्र त्या मुलांना विजेविना सांभाळताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब रेडकर यांच्या कानावर अंगणवाडी सेविकांनी मांडली. यामुळे सामाजिक कार्याचा पिंड असलेल्या समीर रेडकर यांना स्वस्थ राहवेना. त्यांनी ही बाब आपल्या वाडीतील ग्रामस्थांना एकत्र करीत त्यांच्या कानावर घातली. आणि यावर आपणच सारे मिळून तोडगा काढू असे गावकरी मंडळींना आवाहन केल. यावर लागलीच सर्व ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत सावंतवाडामधील अंगणवाडीला वीजजोडणीसाठी प्रयत्न सुरू केले. ही वीज जोडणी करीत असतानाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र सर्वांच्या एकजुटीने सर्व समस्यांवर मात करीत महावितरणकडे वीज जोडणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. महावितरणनेही या प्रस्तावाची तात्काळ दखल घेत अंगणवाडीला स्वतंत्र वीज मीटर मंजूर केला. हा सारा वीज जोडणीचा खर्च ग्रामस्थांनी स्वतःच उचलला. इतकचं नव्हे तर सावंतवाड्यातील ग्रामस्थांनी स्वतः काही रक्कम जमवत वीज जोडणीसाठी आवश्यक सर्व सामग्री आणली व अंगणवाडीत वीज जोडणी केली. अंगणवाडी प्रकाशमान झाल्याने यासाठी मेहनत घेणारे ग्रामस्थ, मुलांसह पालकांच्या आणि विशेषतः चिमुकल्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या अंगणवाडी सेविका यांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळला.

गावकऱ्यांच्या एकिने अंगणवाडी सेविका भारवल्या...

तब्बल २२  वर्षांनी अंगणवाडी इमारतीत वीज पोहचल्याने  शिक्षिका उज्ज्वला कुबल या मनोमन समाधानी झाल्या. २३ चिमुकल्यांना आता त्यांना अधिक जोमाने सांभाळण्याची ऊर्जा आली होती. यासाठी त्यांनी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करीत आभार मानले. यावेळी माता कमिटी अध्यक्ष तन्वी डांगी, शिक्षक प्रशांत निंबाळकर, श्रीगणेश गावडे, पांडुरंग बोर्डेकर, समीर रेडकर, शाणी बोर्डेकर, शिवाजी रेडकर, वैभव रेडकर, रामचंद्र मणेरीकर, दादा रेडकर, बाळा रेडकर, उल्हास रेडकर, मनोज खांबल, मदन कुंदेकर, श्रीधर कुंदेकर आदी उपस्थित होते.