
सिंधुदुर्गनगरी : वन्य प्राण्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी 4 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय किसान संघा मार्फत मोर्चा काढला जाणार आहे अशी माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत व अभय भिडे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात विविध वन्य प्राण्यांनी शेती व शेतमाल यांचे अतोनात नुकसान केले आहे. मागील एक महिन्यात गव्या रेड्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे तर एक जखमी झाला आहे. या फक्त प्रसिद्धीला आलेल्या घटना आहेत. परंतु अशा दररोज अनेक घटना घडत आहेत. कालपर्यंत फक्त शेती व शेतमालाचे नुकसान करणारे प्राणी आज शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहेत. यांचा त्वरित व परीणाम कारक योग्य बंदोबस्त केला नाही तर जगाच्या अन्न सुरक्षेची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्याची अन्न सुरक्षा धोक्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील शेती ओस पडणार आहे व त्याचा परीणाम जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक स्थितीवर होणार आहे.
यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय किसान संघ मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना मोर्चाने जाऊन निवेदन देणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी केले आहे.व शेतकऱ्यांनी अभय भिडे 9420733942 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.