
दापोली : चिपळूण येथील समर्थ भंडारी सहकारी पतसंस्थेच्या दापोली शाखेत सोन्याचे खोटे दागिने ठेवून त्यावर २ लाख ९० हजार रुपयांचे सोने तारण कर्ज घेऊन पतसंस्थेची फसवणूक करणाऱ्या एका महिलेविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थ भंडारी सहकारी पतसंस्थेच्या दापोली शाखेत काल (ता.२५) रोजी दुपारी ११ वाजता वनिता सुरेश केळकर रा. खेर्डी असे ओळखपत्र घेऊन एक महिला एका पुरुषासह तिचे सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी आली होती. तिने आणलेले दागिने पतसंस्थेच्या अधिकृत सोनाराने तपासून ते सोन्याचेच असल्याचा अहवाल दिल्यावर तिचे ५४ ग्रॅम ७०० मिलीग्रॅम सोने तारण ठेवून तिला २ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज या पतसंस्थेकडून देण्यात आले. कर्जाची रक्कम घेऊन ती महिला पतसंस्थेतून निघून गेली. त्यानंतर याच पतसंस्थेच्या हर्णे शाखेतील ती पुन्हा सोने तारण कर्ज घेण्यासाठी गेली. त्यासाठी तिने तिचे ओळखपत्र दिले. त्यावर सुनीता नरेश तवसाळकर असे नाव होते व पत्ता पाळंदे असा होता. कागदपत्र तपासणारा कर्मचारीही पाळंदे येथील होता त्याने त्या महिलेला तुम्ही पाळंदे येथे कोठे राहता असे विचारले असता या महिलेने विठ्ठल मंदिराच्या मागे आपण रहात असल्याचे त्याला सांगितले. मात्र तिचा संशय आल्याने त्या कर्मचाऱ्याने याच पतसंस्थेच्या दापोली शाखेत कार्यरत असलेला व पाळंदे हेच गाव असलेल्या कर्मचार्याला कॉल केला. व त्याला या महिलेचे ओळखपत्र पाठवून ती पाळंदे येथील आहे का अशी विचारणा केली. त्या कर्मचाऱ्याने त्या महिलेचा फोटो पाहिला असता फोटोत असलेल्या महिलेने काही वेळापूर्वी दापोली शाखेतून वेगळे नाव व पत्ता देवून सोने तारण कर्ज घेतले होते. त्यामुळे शंका आल्याने या महिलेने दापोली शाखेत ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सोनाराला बोलावून पुन्हा अॅसिड तपासणी केली असता ते खोटे असल्याचे आढळले. त्यानंतर काही काळ हर्णे शाखेतील कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला हर्णे शाखेतच दागिने तपासायचे असल्याचे सांगून थांबवून ठेवले होते. मात्र त्या महिलेला संशय आला व तिने हर्णे शाखेतून पोबारा केला. मात्र तिच्या सोबत आलेल्या एका पुरुष व्यक्तीला ताब्यात घेवून दापोली पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
या प्रकरणी पतसंस्थेच्या दापोली शाखा व्यवस्थापक यांनी दापोली पोलीस ठाण्यात संशयित महिले विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. मात्र हर्णे येथील पतसंस्थेच्या कर्मचार्यांनी सावधगिरी दाखविल्याने त्यांचे होणारे नुकसान टळले आहे.