
दोडामार्ग : कणकुंबी, जि. बेळगाव येथे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवरील पोलिस ठाण्याचे अधिकारी यांची संयुक्त बैठक गुरूवारी दुपारी झाली. या बैठकीत सर्व अवैध धंदे, संशयित फरार आरोपी व इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोपी तसेच निवडणूक कालावधीत घडणाऱ्या गुन्ह्यांच्या माहितीची देवाणघेवाण व्हावी यावरही चर्चा करण्यात आली.
सिंधुदुर्ग, बेळगाव व गोवा पोलिसांमध्ये समन्वय रहावा यासाठी बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. व्ही. बसर्गी यांच्या अध्यक्षतेखाली कणकुंबी येथे पोलिस अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी कविता गायकवाड, दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री इंगवले, डिचोली गोवाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सागर इकोस्कर, वाळपई पोलीस निरीक्षक राहुल नाईक, बैलहोंगलचे (कर्नाटक) उपाधीक्षक रवी डी. नायक, खानापूर पोलीस निरीक्षक रामचंद्र नाईक, चंदगड पोलीस उपनिरीक्षक शेखर बारामती व अंमलदार उपस्थित होते.
आंतरराज्य सीमा भागातील विविध विषयासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. यात बेकायदेशीर दारू, अमली पदार्थ, शस्त्रे पैसे याची वाहतूक होणार नाही याबाबत उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. तसेच घोषित व फरार आरोपी, नापत्ता व्यक्ती, गंभीर गुन्ह्यातील आरोपी व मालमत्ता संबंधी गुन्हे व त्यातील आरोपी शोधण्याबाबत चर्चा करण्यात आली. तिन्ही राज्यांच्या सीमेवरील पोलिसांना एकमेकांच्या सहकार्याने व समन्वयाने काम करणे सोपे व्हावे यासाठी ही बैठक घेण्यात आली. एखादी गंभीर अथवा त्यांनी राज्यांसाठी आवश्यक असलेली माहिती तात्काळ शेअर करण्यासाठी सहकार्य करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.