मच्छिमार जितेश वाघ कुटुंबियांना मदतीचा हात

तिन्ही मुलांच्या नावे शिक्षणासाठी 2 लाखांची मुदत ठेव
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 21, 2025 17:23 PM
views 90  views

मालवण : महिन्याभरापूर्वी समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या मेढा येथील मच्छिमार जितेश वाघ यांच्या कुटुंबियांना दांडी स्थानिक मच्छीमार संघ, मेढा स्थानिक रहिवासी व मातृत्व आधार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक मदत करण्यात आली. २  लाख रुपये रक्कमेची मुदत ठेव ही मयत जितेश वाघ यांच्या तिन्ही मुलांच्या नावे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी ठेवण्यात आली.

यामध्ये मेढा स्थानिक रहिवासी तर्फे १ लाख ५० हजार ६०० रुपये, दांडी मच्छिमार संघतर्फे २५ हजार रुपये व मातृत्व आधार फाउंडेशन तर्फे २४ हजार ४०० रुपये अशी एकूण २ लाख रक्कमेची मदत करण्यात आली. ही मदत वाघ यांच्या मुलांच्या नावे मुदत ठेव म्हणून ठेवण्यात आली असून त्याचे कागदपत्र जितेश वाघ यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी संतोष लुडबे, महेश कांदळगावकर, दादा वेंगुर्लेकर, नरेश हुले, विकी चोपडेकर, संजय गावडे, मनोज खोबरेकर, भाऊ मोर्जे, प्रमोद मोहिते, प्रा. आर. एन. काटकर, नितीन मांजरेकर, उमेश सांगोडकर, सदा चुरी, उदय मोंडकर, राजा इब्रामपूरकर, नुपूर तारी, रोहित जोशी, श्री. मंडलिक आदी व इतर उपस्थित होते.