सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा

कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा म. सहकारी बँक पुरस्कार प्रदान
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 23, 2025 19:37 PM
views 212  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्यात अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कोकण विभागातून सन २०२३-२४ साठीचा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार प्राप्त झाला असून बँकेच्या शिरपेचात हा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कै. वैकुंठभाई मेहता यांचे सहकार क्षेत्रासाठीचे योगदान महत्त्वपुर्ण असून त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.

महाराष्ट्र राज्याचे गृह निर्माण, शालेय शिक्षण, सहकार राज्यमंत्री  पंकज भोयर व कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा बुधवार दि. २३ जुलै २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे संपन्न झाला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन यांच्या वतीने प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यास जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष  अतुल काळसेकर संचालक, गणपत देसाई, रवींद्र मडगांवकर, समीर सावंत, श्रीम.नीता राणे, श्रीम. प्रज्ञा ढवण, मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रमोद गावडे हे उपस्थित होते.  

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मार्च २०२५ अखेर ६००० कोटीचा व्यवसायाचा टप्पा गाठलेला असुन आता ८००० कोटीच्या व्यवसायाच्या उद्दीष्टाकडे वाटचाल सुरु केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला सहकाराची जोड देऊन या जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान जिल्हा बँक देत आहे. यशाचे हे टप्पे गाठत असतांना बँकेने सामाजिक भान राखत विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. अशा या नामांकीत पुरस्कारांच्या माध्यमातून मिळणारी कौतुकाची थाप ही यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी ऊर्जा देणारी आहे. 

बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सिंधुदुर्ग बँकेचे संचालक  नितेशजी राणे  व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. 

जिल्हा बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे जिल्हावासिंयांच्या मनात एक विश्वासाचे नाते तयार झाले असून जिल्ह्याच्या विकासामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा मोलाचा वाटा आहे. बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये बँकेच्या सभासद संस्था, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांचा वाटा असून याचबरोबर बँकेचे कर्जदार, ठेवीदार, ग्राहक यांचा बँकेवर असलेला अतूट विश्वास त्यामुळे बँकेची नियमित आर्थिक प्रगती होत आहे. बँकेच्या पुढील वाटचालीमध्ये सर्वांचे असेच मोलाचे सहकार्य लाभेल असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी  यांनी व्यक्त केला आहे.