मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम

भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नियोजन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 21, 2025 11:33 AM
views 232  views

कणकवली : पालकमंत्री नीतेश राणे यांच्या वाढदिवसानिमित कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व १७० गावांमध्ये विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील संपर्क कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, विधानसभाप्रमुख मनोज रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाध्यक्ष राजन चिके, माजी उपसभापती संतोष कानडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, श्रीकृष्ण परब, रामू विखाळे, समीर प्रभुगावकर, आण्णा कोदे, गणेश तळगावकर, पंढरी वायंगणकर, बंड्या मांजरेकर, अभिजित सावंत उपस्थित होते.

सलग तिसºयांदा आमदारपदी निवडून आलेल्या नीतेश राणे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये प्रथमच थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. तसेच सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही नीतेश राणे यांच्यावर सोपविण्यात आली. कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाल्यानंतर २३ जून रोजी नामदार नीतेश राणे यांचा पहिलाच वाढदिवस साजरा होणार आहे.


पालकमंत्री नीतेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ जून रोजी कणकवली देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील सर्व १७० गावांतील ग्रामदैवत मंदिरात अभिषेक केला जाणार आहे. पालकमंत्री नीतेश राणेंना दीघार्युरारोग्य लाभण्यासाठी ग्रामदैवताना साकडे घालण्यात येणार आहे. कणकवली तालुक्यात भाजपच्या विभागनिहाय विविध कार्यक्रमांचे आयोजन पालकमंत्री नीतेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे.

फोंडाघाट विभागात २२ जून रोजी फोंडाघाट येथे महाआरोग्य शिबीर भरविण्यात येणार आहे. या महाआरोग्य शिबिरात विविध मोफत तपासणी तसेच औषधोपचार केले जाणार आहेत. २३ जून रोजी गांगेश्वर मंदिर लोरे नं.१ येथे अभिषेक करण्यात येणार आहे. २३ जून रोजी फोंडाघाट विभागातील २ हजार विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केले जाणार आहे. नांदगाव विभागाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत दशावतार कलाकारांचा संयुक्त नाट्यप्रयोग २३ जून रात्री ८ वाजता नांदगाव मधलीवाडी येथे होणार आहेत. तळेरे-खारेपाटण विभागात २२ जून रोजी पालकमंत्री चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे.

२३ रोजी रस्सीखेच स्पर्धा होणार असून गांगेश्वर मंदिर येथे महाआरती होणार आहे. कळसुली विभागात २३ जून रोजी कळसुली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वागदे बोर्डवे विभागात कुपोषित मुलांसाठी शिबीर व संगोपन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कलमठ विभागात २३ जून रोजी सकाळी ग्रामदेवतेच्या मंदिरात अभिषेक करण्यात येणार असून नंतर वृक्षारोपण केले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. निराधार महिलांसाठी मदत करण्यात येणार असून सफाई कर्मचाºयांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाणार आहे., वरवडे गावातील सर्व शाळांमध्ये बाल आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. वागदे येथे सकाळी १०.३० वाजता गावातील कुपोषित बालकांना तीव्र व मध्यम तीव्र कुपोषित मुलांना ग्रामपंचायतीमार्फत कायमस्वरूपी व्हिटॅमिन सिरप वाटपाची सुरुवात करण्यात येणार आहे. बेळणे येथे शालेय विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात येणार आहे. याच धर्तीवर वैभववाडी आणि देवगड तालुक्यातही नियोजन करण्यात आले आहे.

फोटो