
कणकवली : कणकवली कासार्डे येथील पोकळे पेट्रोल पंपाचे मालक प्रवीण प्रभाकर पोकळे ( ५४, कासार्डे जांभळगाव) यांच्या बँक खात्यातील तब्बल २ लाख १९ हजार १७० रुपये अज्ञात चोरट्याने 'ऑनलाईन पद्धतीने लंपास केले. चोरट्याने पोकळे यांचे पेटोल पंपावरील मॅनेजर अमृत राणे यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, आपण फिनो बँकेचे कर्मचारी असल्याची बतावणी केली. पेट्रोलपंपावर वापरण्यात येत असलेली स्वॅप मशीन अपडेट करणे गरजेचे असल्याची बतावणी करीत राणे यांच्या नंबरवर कुठली तरी लिंक व ओटीपी नंबर पाठवून रक्कम लाटली. २० डिसेंबरला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेबाबत गुरुवारी कणकवली पोलीस ठाण्यात नोंद झाली.
घटना अशी, पोकळे यांच्या पेट्रोल पंपावर वापरण्यात येणाऱ्या स्वॅप मशीनला त्यांचे मॅनेजर अमृत राणे यांचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. पोकळे यांचे फिनो बँकेचे अकाऊंट आहे. २० डिसेंबरला राणे यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरून बोलणाऱ्याने आपण फिनो बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले. तुमची स्वॅप मशीन अपडेट न केल्यास बंद पडणार आहे. त्यासाठी मला केवायसी पाठवा, असे पलिकडून बोलणाऱ्याने सांगितले.
राणे यांनी तासाभराने संपर्क करतो, असे सांगितले. मात्र, पलिकडून बोलणाऱ्याने 'ही सगळी कृती आताच करणे गरजेचे आहे.' असे सांगितले. त्याने तात्काळ राण यांच्या नंबरवर एक लिंक व ओटीपी नंबर पाठवला. त्याने सांगितल्यानुसार राणे यांनी संशयिताने दिलेली लिंक उघडली व त्यामध्ये संशयितानेच पाठविलेला ओटीपी नंबर टाकला. त्याचप्रमाणे त्याने राणे यांना आणखी काही बाबी करायला सांगितल्या व फोन ठेवला.
तब्बल ११ ट्रान्जेक्शन
दरम्यान, काही वेळानंतर पोकळे यांच्या खात्यातील रक्कम कमी होत असल्याचे निदर्शनास आले. खात्री केली असता तब्बल ११ 'ट्रान्जेक्शन्स' होऊन पोकळे यांच्या खात्यातील तब्बल २ लाख १९ हजार १७० रुपये कमी झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे समजल्याने पोकळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावरोधात भा. दं. वि. कलम ४०६, ४२०, माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम २००८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.