
दोडामार्ग : एकीकडे दसरा उत्सव सर्वत्र साजरा होत असताना कुंब्रल येथील एका घरात काल शनिवारी तब्बल चार फुटी नाग साप आढळून आला. काहीशा अडगळीच्या जागेत आढळून आलेल्या या सापाला पकडून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की कुंब्रल मधील सचिन आत्माराम सावंत यांच्या घराच्या पुढील बाजूस दुपारी साधारणतः तीन ते साडेतीन च्या दरम्यान एक चार फुटी नाग साप आढळून आला. श्री सावंत यांच्या घरालगत गुरांचा गोठा असून ह्या गोठ्यालगतच हा नाग साप आढळून आला. या सापाने काही कोंबड्यांची तब्बल चार अंडी गिळली होती. सावंत कुटुंबीयांनी तातडीने भोमवाडी पुनर्वसन येथील सर्पमित्र लाडू गवस यांना पाचारण केले. श्री. गवस यांनी मोठ्या कौशल्याने या नाग सापाला पकडले व नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. त्यानंतर सावंत कुटुंबीयांनी सुटकेचा नि :श्वास सोडला.