
देवगड : देवगड मोंड येथील विविध सहकारी सेवा सोसायटी लि.च्या नूतन इमारतिचा उदघाटन सोहळा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. विकासाची मानसिकता लोकांनी तयार ठेवावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. गावात पर्यटनात्मक संकल्पना राबविन्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे सरचिटणीस संदीप साटम, बाळ खडपे, तालुकाध्यक्ष महेश नारकर, देवगड अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन अभय बापट, विकास सोसायटीचे अध्यक्ष गोविंद झरकर, माजी अध्यक्ष बाळकृष्ण अनुभवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश राणे, मोंड गावच्या सरपंच शामल अनुभवणे, पडेल गावचे सरपंच भूषण पोकळे, मळेगाव व मोंडपार गावचे सरपंच आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी हा विकासाचा पाया आहे.गावाचा विकास सर्वच गावकऱ्यांनी एकत्र येऊन केला पाहिजे.ग्रामीण भागामध्ये मतभेद असतील तर विकासाला अडचणी येतात. विकासासाठी एकत्र या; गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मोंड गावाच्या विकासाची वाटचाल लक्षात घेता या गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. मोंड गावाला विकासाच्या माध्यमातून एक आदर्श गाव बनविणार, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मोंड येथे दिली
मोंड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने आपली नूतन इमारत उभी केली असून, या इमारतीचे उद्घाटन नामदार नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.त्यानंतर ते बोलत होते.यावेळी त्यांनी गावाच्या विकासाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विभागाचे आत्ता सुमारे ३०० कोटी रुपये बजेट आहे. हे पैसे डिसेंबरपर्यंत खर्च करून, पुढील एप्रिलपर्यंत आणखी शंभर कोटी रुपये मी मिळवणार आहे. पुढील पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे वार्षिक बजेट १००० कोटी रुपयांपर्यंत नेऊ, अशी घोषणाही नामदार नितेश राणे यांनी केली
भाषणामध्ये मोंड-वानीवडे पुलाचाही उल्लेख केला. या भागात असलेल्या कांदळ वनांचा प्रश्न कोर्टात आहे. कोर्टाची सुनावणी संपत आली असून, लवकरच आपणाला या पुलाच्या कामासाठी परवानगी मिळेल. "मग मात्र मी निधी कमी पडू देणार नाही.विकासकामे करून या भागाचा बॅकलॉग कमी करणार आहे. माझ्या मतदारसंघात निधी देताना मी हात आखडता घेत नाही," असे ते म्हणाले.
"देवगड तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती भाजपाच्या झेंड्याखाली असून, मोंड ग्रामपंचायतही भाजपाच्या झेंड्याखाली यावी," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित माजी आमदार अजित गोगटे यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "विकास सोसायटी ही विकासाची गुरुकिल्ली आहे. सर्वांनी एकत्र येऊन विविध व्यवसाय या सोसायटीच्या माध्यमातून करावेत व गावाचा विकास साधावा." तसेच त्यांनी हेही नमूद केले की, "केंद्रीय मंत्री अमित शहा सध्या सहकार खात्याचे मंत्री असून, त्यांनी या विकास सोसायट्यांना बळ देण्याचे काम केले आहे." जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस यांनी सांगितले की, "विकास सोसायट्यांनी विविध योजना राबवाव्यात, व्यवसाय उभारावेत यासाठी जिल्हा बँक त्यांच्या पाठीशी आहे. आवश्यक असणारे कर्ज आम्ही उपलब्ध करून देऊ. विकास सोसायटीने आपली इमारत बांधण्यासाठी जिल्हा बँकेकडून कमी टक्केवारीने कर्ज घ्यावे; ते आम्ही देऊ," असा शब्द त्यांनी दिला.
मोंड ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष शरदचंद्र कुलकर्णी यांनी मंडळाच्या वतीने सांगितले की, "आपण गावातील अनेक उपक्रमांसाठी जागा दिली असून, मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर इमारती उभ्या करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचबरोबर मोंडमध्ये बगीचा व नाना-नानी पार्क उभा करावा," अशी मागणीही त्यांनी केली. नामदार नितेश राणे यांनी "प्रस्ताव पाठवा, मंजुरी देतो," असा शब्द दिला.सोसायटीच्या वतीने नामदार नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जमीन मोफत दिल्याबद्दल मोंड ग्रामस्थ विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष शरदचंद्र कुलकर्णी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.