
सावंतवाडी : सावंतवाडी शहरांतील २१ दिवसांच्या सार्वजनिक गणरायांना वाजत, गाजत निरोप देण्यात आला. भर पावसात देखील गणेशभक्तांच्या उत्साहात कोणतीही कमी नव्हती. पुढच्या वर्षी लवकर या....! अशी साद घालत त्यांनी बाप्पाला निरोप दिला. रात्री मोती तलाव येथे गणेशमूर्तींचे थाटामाटात विसर्जन करण्यात आले. ढोल ताशांचा गजर, हलगीसह बेंजोचा नाद, वारकरी भजन अन् आकर्षक देखावे विसर्जन मिरवणूकचे खास आकर्षण ठरले.
येथील तळकोकणातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा, उभाबाजार हनुमान मंदिर गणेशोत्सव मंडळ, वैश्यवाडा हनुमान मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या २१ दिवस विराजमान गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. पावसाचा मोठा व्यत्यय असताना देखील हाती छत्री, रेनकोट परिधान करून गणेशभक्त विसर्जनासाठी सज्ज झाला. रात्री उशिरा पावसानं दडी मारल्यानंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. विसर्जन मिरवणूकीत ढोल पथक, हलगीसह बेंजो पथक खास लक्षवेधी ठरले.
वारकरी भजन मेळा, महिलांच्या फुगडी कार्यक्रमांनी विसर्जन मिरवणूकीत भर पडली. उभाबाजार येथील मारूती, वैश्यवाडा येथील भवानी तर सालईवाडा येथील नरसिंह अवतार देखावा खास आकर्षण ठरला. महिला, युवकांसह गणेशभक्त विसर्जन मिरवणूकीत देहभान विसरून तल्लीन झाले होते. ढोलपथकाच्या तालावर बेभान होऊन नाचताना पहायला मिळाले. रात्री उशिरा वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा जय घोषाने यावेळी आसमंत दुमदुमून गेला होता. विसर्जन सोहळा अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मोती तलावकाठी हजेरी लावली होती.