वैभववाडीतील 'त्या' स्टॉल - बांधकामाबाबत निर्णय घ्यावा ; न.पं.ची तहसीलदार यांच्याकडे मागणी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 12, 2023 19:33 PM
views 220  views

वैभववाडी : वैभववाडी शहरातील शासकीय जमीनीतील बांधण्यात आलेले स्टाॅल व गाळे हटविण्यात यावे अशी मागणी आज ता.१२ नगरपंचायतीने तहसिलदार दिप्ती देसाई यांची भेट घेवुन केली. नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांनी दोन वेगवेगळी पत्रे दिली आहेत. यावेळी तहसिलदारांनी अतिक्रमणासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. 

    वैभववाडी बाजारपेठेतील रस्त्यांच्या दुतर्फा असलेले  स्टॉल वाभवे वैभववाडी नगरपंचायतीने फेब्रुवारी महिन्यात हटविले. ही स्टॉल हटाव मोहीम राबविल्यानंतर आता जुना कोकिसरे रस्ता, सांगुळवाडी रस्ता, सार्वजनिक भुखंड, आणि शासकीय शौचालयानजीकच्या भुखंडावर अनेक स्टॉल गेल्या आठ ते दहा दिवसांत उभे राहीले आहेत.ज्या ठिकाणी हे स्टॉल उभे केले जात आहेत. त्याठिकाणची जागा ही महसुल विभागाची असल्यामुळे आज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, महिला व बालकल्याण सभापती यामिनी वळवी, आरोग्य शिक्षण सभापती  राजन तांबे, नगरसेवक सुदंराबाई निकम,सुभाष रावराणे, डॉ.राजेंद्र पाताडे, रेवा बावदाणे यांनी तहसिलदार सौ.देसाई यांची भेट घेतली. यावेळी नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील शासकीय जमीनीवर होत असलेल्या अतिक्रमणाचा विकास कामात अडथळा होत असल्यामुळे नगरपंचायतीने ती अतिक्रमणे हटविली होती. परंतु आता पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमणे होत आहेत.या जागांवर स्टॉल लावायला महसुल विभागाने परवानगी दिली आहे का असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. जर परवानगी दिली नसेल तर ती अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी तहसिलदार सौ.देसाई यांनी अतिक्रमण केलेल्या सर्वाना तातडीने नोटीस देण्यात येईल. नोटीस दिल्यानंतर अतिक्रमण काढून घेतले नाही तर मात्र पुढील निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.