
मालवण : जमाव करून बोटीवरील खलाशांना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी आणि बोटीवरील साहित्य घेवून गेल्या प्रकरणी तळाशिल येथील २५ जणांवर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची फिर्याद मत्स्य व्यवसायिक कृष्णनाथ तांडेल यांनी दिली आहे.
तालुक्यातील तळाशिल येथील समुद्रात काल रविवारी सायंकाळी मच्छीमारांच्या दोन गटात संघर्ष झाल्याची घटना घडली होती. यामध्ये सर्जेकोट येथील कृष्णनाथ तांडेल यांच्या चिन्मय प्रसाद व प्रथमेश लाड यांच्या पीर सुलेमान या नौका समुद्रात मासेमारी करत असताना तळाशील येथील काही मच्छीमारांनी दोन्ही बोटींवर चढत बोटीवरील खलाशांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचप्रमाणे बोटीवरील दोन मोबाईल सेट, वायरलेस सेट, दोन जी पी एस संच, दोन फिश फाइंडर, २ बिनतारी संदेश यंत्रणा, बॅटरी व अन्य मासेमारी साहित्य मिळून तीन लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल नेला. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात तळाशिल येथील २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये कृष्णा कांदळगावकर, नाना तळाशीलकर, अक्षय पवार, प्रथमेश शेलटकर, सुहास चेंदवणकर, धनंजय राऊळ, रामजी बागवे, करण कांदळगावकर, रत्नखचित आडकर, प्रणय शेलटकर, भरत कोचरेकर, संजय केळुस्कर, यांचा समवेश आहे. या सर्वांवर भादवी कलम ३२७, १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन नरळे अधिक तपास करत आहेत.