कुडाळ न.पं.च्या भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेत मोठा घोळ

विलास कुडाळकर यांचा आरोप
Edited by: भरत केसरकर
Published on: June 18, 2023 12:39 PM
views 111  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीने कुडाळ शहरांमध्ये राबविलेल्या भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेत मोठा घोळ असून ही मोहीम राबवण्यासाठी ठेका दिलेल्या कराड येथील व्हेट्स फॉर ॲनिमल या संस्थेची नोंदणी २ मे २०१९ मध्ये सातारा येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशाने रद्द करण्यात आलेली आहे. नोंदणी रद्द झालेल्या या संस्थेची कागदपत्र पडताळणी न करता कुडाळ नगरपंचायतीने १ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्यासोबत या मोहिमेसाठी करार केला आहे. कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून लाखो रुपये लाटण्याचा प्रयत्न सत्ताधारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी करून कुडाळवासियांची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकारद्वारे केला आहे. या संस्थेसह या प्रक्रियेत करार करणाऱ्या सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी वरिष्ठ स्तरावर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


कुडाळ नगरपंचायतीने कुडाळ शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेची सुरुवात २६ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२२ या १७ दिवसांच्या कालावधीत करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याबाबत जिल्हा प्रशासनासह स्थानिक प्रशासनाला निवेदनाद्वारे सांगण्यात आले होते. मात्र यावर कोणत्याही प्रशासनाने कारवाई केली नाही. ५०० कुत्र्यांवर केलेली शस्त्रक्रिया ही बोगस असल्याचेही सांगून त्याची चौकशी सुद्धा केली नाही. तसेच या संस्थेबाबत संशय निर्माण केला होता. त्याची खातरजमा सुद्धा नगरपंचायत प्रशासनाने केली नाही. मुळात सत्ताधाऱ्यांना या मोहिमेतून लाखो रुपये लाटायचे होते. या मोहिमेसाठी नगरपंचायतीच्या स्वनिधी मधून खर्च केला जाणार होता. ९ लाख ४५ हजार रूपये एवढे बिल या मोहिमेसाठी दिले जाणार होते. मात्र तक्रारी अर्ज केल्यानंतर हे बिल थांबविण्यात आले मात्र त्यावर कोणतीही कारवाई त्यानंतर करण्यात आली नाही.


दरम्यान व्हेटस फॉर ॲनिमल या संस्थेने ठेका घेताना नगरपंचायतीला दिलेल्या कागदपत्रांमध्ये नोंदणी क्र. (एफ-१०९११) व सोसायटी नंबर (महाराष्ट्र /११६९९) या प्रमाणपत्रांची आणि इतर कागदपत्रांची अधिक माहिती घेण्यासाठी ही संस्था ज्या ठिकाणी नोंदणीकृत झाली त्या सातारा येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त (वर्ग १) यांच्याजवळ अभिलेखाची पडताळणी करून त्याबाबत त्या कागदपत्रांची नक्कल मागितली असता सातारा येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयातून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.


सातारा येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याजवळ या कागदपत्रांची अर्जाद्वारे मागणी केल्यानंतर या नक्कला दि. १४ जून २०२३ रोजी देण्यात आल्या. यामध्ये सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी या संस्थेची नोंदणी २ मे २०१९ रोजी रद्द केल्याची आदेश प्राप्त झाला. या आदेशामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की संबंधित संस्थेने संस्था स्थापन झाल्यापासून म्हणजे २००७ पासून कोणत्याही प्रकारचे उपक्रम तसेच हिशोब सादर केले नाहीत. म्हणून ही संस्था रद्द करण्यात आली आहे असे म्हटले आहे.


रद्द झालेल्या संस्थेशी करार कसा केला?


कराड येथील या संस्थेची नोंदणी २०१९ मध्ये रद्द करण्यात आली. या रद्द झालेल्या संस्थेला कुडाळ नगरपंचायतीने ठेका दिला मुळात या संस्थेची कागदपत्रांची कोणत्याही प्रकारे खातरजमा किंवा पडताळणी करण्यात आली नाही. शासनाच्या नियमानुसार धर्मादाय आयुक्त येथे नोंदणीकृत झालेल्या संस्थेला ठेका किंवा काम द्यायचं असेल तर त्या संस्थेच्या मागील तीन वर्षाचा हिशोब झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच संस्था कशासाठी नोंदणीकृत झाली आहे हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे मात्र कुडाळ नगरपंचायतीच्या प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी याची कोणतीही पडताळणी न करता या मोहिमेतून लाखो रुपये कसे मिळवता येतील याकडे पाहून हा करार केला.


करारावर सह्या करणाऱ्यांवर सुद्धा झाली पाहिजे कारवाई


मुळात प्रशासनाने याची खातरजमा करणे आवश्यक होते मात्र त्याबाबत कोणतीही खातरजमा न करता हा ठेका कराड येथील व्हेट्स फॉर ॲनिमल्सला देण्यात आला. ज्या व्यक्तीसोबत करार करण्यात आला आहे ती व्यक्ती या संस्थेच्या कोणत्याही पदावर कार्यरत नाही. या संस्थेने त्यांना प्राधिकृत केल्याचा कोणताही पुरावा किंवा त्या संदर्भातील ठराव नगरपंचायतीच्या कागदपत्रांमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये कागदपत्रांचा घोळ आणि नगरपंचायतीची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या संस्थेसह कुडाळ नगरपंचायतीच्या स्थायी समितीमधील सदस्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी कारण त्यांनी या करारावर सह्या केल्या आहे. अशी मागणी वरिष्ठस्तरावर केली जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी म्हटले आहे.