हापूस आंब्याचं पीक टिकविण्याचे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 11, 2024 07:51 AM
views 278  views

देवगड : देवगड तालुक्यात सध्या अवेळी पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा पीकावर त्याचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या पावसाचा आंबा पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार झाला असून, यामुळे भुरी बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढणार आहे.

अवकाळी पाऊस पडल्याने आंबा कलमांवरती याचा मोठा विपरीत परिणाम होणार आहे. आंबा कलमांचा मोहोर पावसाच्या पाण्यामुळे काळा पडून त्यावर भुरी व बुरशीजन्य रोग वाढणार आहेत. त्यामुळे यावर्षीच्या आंबा पिकाला मोठा फटका बसणार असल्याचे समोर येत आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात आलेल्या आंबा कलम मोहोरांना फळधारणा झाली आहे. या फळांनाही काळे डाग पडून आंबे खराब होण्याचे प्रमाणही वाढणार आहे.

यावर्षी देवगड तालुक्यात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपासून आतापर्यंत सुमारे एकूण उत्पन्नापैकी ३० ते ४० टक्के आंबा कलमांना मोहोर आला आहे. त्या मोहोरवर येथील बागायतदारांनी वेळोवेळी कीटकनाशक फवारण्या करून आंबा पीक उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू होते.

त्यातच अवकाळी पावसाच्या वक्रदृष्टीमुळे यावर्षीही आंबा पीक अल्प प्रमाणातच राहणार की काय, अशी शंका व भीती बागायतदारांच्या मनात निर्माण झाली आहे. आधीच थंडी कमी पडली आहे. त्यामुळे हंगामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित  होत आहे.

या अवेळी पडणाऱ्या पावसामुळे फळमाशीचा देखील शिरकाव होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. फळधारणा झाल्यानंतर अवकाळी पाऊस पडल्यास फळ माशांचा शिरकाव  होतो. त्यामुळे अवकाळी पाऊस पडल्यामुळे येथील आंबा बागायतदारांनाअनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान व मानसिक त्रासही बागायतदारांना सहन करावा लागत आहे.  ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आंबा कलमांना मोहर येण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर आतापर्यंत मोहोर येण्याची प्रक्रिया थंडी कमी असतानाही चांगलीच होती. तालुक्यातील 40% आंबा कलमांना मोहर आला आहे. उर्वरित काही कलमाना मोहोर येण्याची लक्षणे दिसत असतानाच अवकाळी पाऊस पडल्यामुळे आलेला मोहर वाया जाऊन.पुढील मोहोर येण्यासही अढथळा निर्माण होणार आहे.अवकाळी पाऊस पडल्यामुळे आंबा बागायतरांना बुरशीनाशक व कीटकनाशक महागडी औषधे घेऊन अतिरिक्त फवारणी करावी लागत आहे. यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था आहे. कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून शासन दरबारी नुकसान भरपाई मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव देणे गरजेचे आहे.