
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय परिसरातील झाड शेजारील शरद जामदार यांच्या घरावर कोसळले. यात वीज वाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्या. या दुर्घटनेत येथून जाणारा समीर पडते हा युवक बालंबाल बचावला. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्याच्यावरच हे संकट टळलं. रहदारीचा व गजबजलेला असा हा रस्ता आहे. विघ्नहर्त्यानेच मोठं विघ्न दूर केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
आज आज दुपारी तहसीलदार निवासस्थानाच्या परिसरात ही घटना घडली. उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस हे झाड होतं. हे झाड विज वाहिन्यांवर पडल्यानं त्या थेट रस्त्यावर आल्या. तातडीने महावितरण व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला. दरम्यान, असाच प्रकार मागील वर्षी राजवाडा परिसरात घडून दोघे युवक ठार झाले होते. त्यानंतर जीर्ण झाड हटविण्याची मागणी केली होती. मात्र, पुन्हा तसाच प्रकार घडल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. वेळोवेळी नगरपरिषद प्रशासन, महावितरण वितरणला जीर्ण झाड तोडण्याची व विद्युत लाईनवरील फांद्या हटविण्याची विनंती करून सुध्दा दुर्लक्ष केल्याचा आरोप नुकसानग्रस्त शरद जामदार यांनी केला. तर या भागात असणारी जीर्ण झाड हटविण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, नगरपरिषदकडून जीर्ण झाड ज्यांच्या मालकीच्या जागेत आहेत अशांना संबंधित धोकादायक वृक्ष हटविण्यासंदर्भात नोटीसा देण्यात आल्या आहेत. नागरीकांकडून देखील सहकार्याची अपेक्षा आहे असं नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महावितरणला जाग कधी येणार ?
महावितरणच्या माध्यमातून दरवर्षी विद्युत लाईनवरच्या फांद्या हटविण्याची मोहीम पावसाळ्यापूर्वी राबविण्यात यायची. मात्र, मागील दोन वर्षांपासून ही मोहीम बंद आहे. शहरातील बहुतांश विद्युतभारीत लाईनवर झाडांच्या भल्या मोठ्या फांद्या आल्या आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी यांच लक्ष वेधून देखील मागील दोन वर्षात याकडे दुर्लक्ष झालं आहे. प्रामुख्याने बाजारपेठांमध्ये हे प्रकार अधीक आहेत. त्यात विद्यूत खांब मुळातून सडलेले आहेत. त्यामुळे महावितरणला जाग येणार तरी कधी ? असा सवाल नागरीक करत आहेत.