'एआय सिंधुदुर्ग मॉडेल'चा नीती आयोगाकडून अभ्यास

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 23, 2025 16:16 PM
views 165  views

सिंधुदुर्गनगरी : तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हा महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला भेट देऊन येथे विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुध्दीमत्ता (Artificial Intelligence) आधारित मॉडेलचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमासाठी दिलेले प्रोत्साहन आणि सर्वतोपरी सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे मॉडेल प्रभावीपणे विकसित होऊ शकले. जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही मोठी झेप ठरणार आहे. मार्व्हल यांनी विकसित केलेले हे मॉडेल अत्यंत यशस्वी ठरले असून, लवकरच ते देशभरात स्वीकारले जाणार आहे. भारतातील पहिले असे 'एआय सिंधुदुर्ग मॉडेल' बनविण्याचा मान आपल्या जिल्ह्याला मिळत असल्याचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रीया पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली. 

एआय मॉडेलचे फायदे

जिल्हा प्रशासनाच्या विविध योजनांचा अचूक व वेगवान आढावा घेता येणार. शेतकरी, विद्यार्थी, उद्योग क्षेत्र व सामान्य नागरिकांना तंत्रज्ञानाद्वारे थेट लाभ मिळणार. भविष्यातील विकास आराखड्यांसाठी डेटा - आधारित निर्णय प्रक्रिया अधिक मजबूत होणार.

सिंधुदुर्गचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिंधुदुर्ग जिल्ह्याने तयार केलेले हे मॉडेल आता राष्ट्रीय पातळीवर स्वीकारले जाणार आहे. नीती आयोगाचे सदस्य या भेटीत स्थानिक स्तरावरील अंमलबजावणीचा सखोल आढावा घेणार आहेत. या भेटीमुळे सिंधुदुर्गाचा नाविन्यपूर्ण उपक्रम देशभरात पोहोचणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रवासात एक नवे पर्व सुरू होणार आहे.