प्रजासत्ताक दिनी दोडामार्गमध्ये ९ उपोषणे..!

Edited by: संदीप देसाई
Published on: January 27, 2024 12:30 PM
views 96  views

दोडामार्ग : न्याय हक्कासाठी व आपल्या विविध मागण्यांसाठी दोडामार्ग तालुक्यात विविध शासकीय कार्यालयांंसमोर प्रजासत्ताक दिनी तब्बल ९ उपोषणे झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर यापैकी आठ उपोषणे त्याच दिवशी सायंकाळपर्यंत मागे घेण्यात आली. तर एका उपोषणावर रात्री उशिरा तोडगा काढण्यात आला.

यात तहसील कार्यालयासमोर दोन, कसई-दोडामार्ग नगरपंचायतीसमोर एक, पंचायत समिती समोर एक, तिलारी येथील जलसंपदा कार्यालय समोर दोन, झरेबांबर ग्रामपंचायत कार्यालय समोर एक, बोडण ग्रामपंचायत समोर एक व कसई-दोडामार्ग म्हांवळणकरवाडी येथील पर्यायी शेत जमिनीत एक अशी एकूण नऊ उपोषणे झाली. लक्ष्मण सखाराम नाईक व शैलेश सुरेश दळवी यांनी सासोली येथील सामायिक क्षेत्रात बेकायदेशीरपणे दिलेल्या अकृषिक सनद रद्द करणे व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर, सदाशिव महादेव सावंत यांनी पुनर्वसन केलेल्या जमिनीवर केस चालू असल्याने २३ वर्षे नुकसान झाल्याबाबत तहसील कार्यालयासमोर, संजय नारायण खांबल यांनी घरबांधणी परवानगी बाबतच्या विविध मागण्यांसाठी येथील नगरपंचायत कार्यालय समोर, आडाळी सरपंच पराग महादेव गावकर यांनी आडाळी एमआयडीसीतील मुद्रांक शुल्क सेस थकित निधी ग्रामपंचायतीला मिळण्याबाबत पंचायत समिती समोर, पांडुरंग शांताराम नाईक यांनी तिलारी डावा कालवा ८ किमी मधील कालव्याच्या गळतीमुळे शेतातील झालेल्या नुकसानीबाबत तिलारी येथील जलसंपदा कार्यालयासमोर, शंकर वासुदेव सावंत, केसरकर व इतर शेतकऱ्यांनी तिलारी प्रकल्पाकरिता संपादित केलेल्या जमिनीबद्दल एक रकमी अनुदान त्वरित मिळावे, या मागणीसाठी तिलारी येथील जलसंपदा कार्यालयासमोर आमरण उपोषण, मधुकर विठ्ठल सावंत व इतर आठ शेतकऱ्यांनी झरेबांबर येथील तिलारी डाव्या कालव्यातून पाईपलाईन द्वारे शेतात जाणाऱ्या पाणी कामात दिरंगाई होत असल्याने या विरोधात झरेबांबर ग्रामपंचायत समोर उपोषण, बोडण सरपंच प्रकाश जयराम कदम यांनी ग्रामपंचायत क्षेत्रात अतिक्रमण केल्याने त्या विरोधात बोडण ग्रामपंचायत समोर उपोषण, डेमो कुसो आयनोडकर यांनी पर्यायी शेत जमिनीत ये-जा करण्याकरिता कायमस्वरूपी रस्ता मिळावा या मागणीसाठी नगरपंचायतीतील म्हावळणकरवाडी येथील मिळालेल्या शेतजमिनीत आमरण उपोषण छेडले होते.

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीसमोर झालेल्या संजय खांबल यांच्या उपोषणा व्यतिरिक्त इतर आठ उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यात अधिकाऱ्यांना सायंकाळपर्यंत यश आले. प्रत्येक उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचे पत्र त्यांना दिल्याने सायंकाळपर्यंत उपोषण मागे घेण्यात आले. मात्र घर बांधणी परवानगी बाबतच्या विविध मागण्यांबाबत संजय खांबल यांनी पुकारलेल्या उपोषणावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत माघार नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने हे  उपोषण रात्री उशिरापर्यंत सुरू राहिले. अखेर रात्री ११ वाजता यावर तोडगा निघाल्याने संजय खांबल यांनी उपोषण मागे घेण्यात आले. तिलारी येथील उपोषणाला पाठबबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी भेट देऊन उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा केली. व त्यांच्या मागणीवर चर्चे अंती तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.