मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ल्यातील ६ रस्त्यांसाठी ८ कोटी २० लाखांचा निधी : नितीन मांजरेकर

Edited by: दिपेश परब
Published on: June 15, 2023 21:19 PM
views 217  views

वेंगुर्ला:

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तालुक्यातील महत्वाच्या सहा रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे ८ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती शिवसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिली आहे.

     यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाकडे तालुक्यातील ग्रामीण भागातील अत्यावश्यक रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. स्थानिकांनी सुचविलेल्या या कामांचे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत ही कामे प्राधान्याने मंजूर व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयात प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली होती. त्यानुसार ही कामे मंजूर झाली आहेत 

    यात वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड, चीरेखण, दळवीवाडी, नाईकवाडी ते न्हावेली रस्त्यासाठी १ कोटी ८८ लाख रुपये, परुळे -कालवण रस्त्यासाठी १ कोटी ४५ लाख, चीपी गाडेधाव - कालवण रस्त्यासाठी १ कोटी १८ लाख, प्रधानमंत्री जिल्हा मार्ग ५६ ते मातोंड सातवायंगणी घोडेमुख १८६ जोड रस्त्यासाठी १ कोटी ६ लाख, होडावडे शाळा नंबर १ ते राऊळवाडी वजराट रस्त्यासाठी १ कोटी १८ लाख, आडेली धरण भोवरवाडी रस्त्यासाठी १ कोटी ४२ लाख अशा एकूण सहा रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे ८ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामांना लवकरच प्रारंभ केला जाईल अशी माहिती नितीन मांजरेकर यांनी दिली. यावेळी जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, मितेश परब आदी उपस्थित होते.