सिंधूरत्न योजनेतून जिल्ह्यातील काजू बोंड प्रक्रिया व टसर रेशीम उद्योगांना ७५ टक्के अनुदान..!

सावंतवाडीत मार्गदर्शन मेळावे
Edited by: विनायक गावस
Published on: March 10, 2024 14:19 PM
views 212  views

सावंतवाडी :  शासनाच्या सिंधूरत्न योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काजू बोंड प्रक्रिया आणि टसर  रेशीम उद्योग यासाठी भरघोस  75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि तांत्रिक माहिती देण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठातील तज्ञांकडून मार्गदर्शन  मेळावे आयोजित करण्यात आले असून या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. या शेतकरी मेळाव्याला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि कृषी विद्यापीठांच्या तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काजू लागवड होत आहे परंतु बोंडू वरील प्रक्रियेचे उद्योग नसल्याने बोंडू फेकून दिले जातात या बोंडूवर प्रक्रिया करून त्याद्वारे आर्थिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने काजू बोंडू प्रक्रिया उद्योगाचे मार्गदर्शन आणि यंत्रसामुग्री देण्यात येणार आहे. या उद्योगाला 75 टक्के अनुदान सिंधू रत्न योजनेतून देण्यात येणार असून मंगळवार 12 मार्च 2024 रोजी दुपारी अकरा वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे इच्छुक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे .

डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे तज्ञ शास्त्रज्ञ या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्यात काजू बोंडू प्रक्रिया उद्योग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना प्रक्रिया यंत्रसामग्री खरेदीवर 75 टक्के अनुदान मंजुरी पत्र देण्यात येणार आहे .शेतकऱ्यांनी मेळाव्यास येताना आधार कार्ड, काजू लागवडीचे सातबारा, किसान कार्ड, बँकेचे पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्र सत्यप्रतीसह सोबत आणावी. काजू बोंड प्रक्रिया उत्पादनाला कोकण कृषी विद्यापीठामार्फत बाजारपेठ मिळवून देण्यात येणार आहे कोकण कृषी विद्यापीठ आणि जिल्हा कृषी खाते या योजनेचे सहयोगी यंत्रणा आहेत.

टसर रेशीम प्रकल्पासही अनुदान

काजू बोंडा प्रमाणे जिल्ह्यात आईन वृक्षावर टसर रेशीम निर्मिती प्रकल्पास पोषक वातावरण असून जिल्ह्यात टसर रेशीम उद्योग प्रकल्प चांगले यशस्वी होऊ शकतात या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे . टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचाही मेळावा मंगळवार 12 मार्च 2024 रोजी दुपारी बारा वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील बचत गटांना तसेच उत्पादन करू इच्छिणाऱ्याना मार्गदर्शन करण्यासाठी वनविभागाचे उपवनसंरक्षक, वरिष्ठ अधिकारी तसेच तज्ञ रेशीम निर्मितीतज्ञ योगेश फोंडे यांचे मार्गदर्शन होणार आहे जिल्ह्यात टसर  रेशीम उद्योग विकसित व्हावा या दृष्टीने सिंधू रत्न योजनेतून मार्गदर्शन देण्यात येणार असून त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा मिळाव्यास येताना शेतकऱ्यांनी आधार कार्ड ,किसान कार्ड ,बँकेचे पासबुक झेरॉक्स सोबत आणावे असे आवाहन करण्यात आले आहे.