लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ६,९७० मतदार वाढले

सिंधुदुर्गात आता एकूण मतदार ६, ७२, ०५३
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 30, 2024 14:54 PM
views 92  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघनिहाय  अंतिम मतदार यादी जिल्हा प्रशासनाने  शुक्रवारी जाहीर केली. मागील  लोकसभा निवडणुकीत असलेल्या जिल्ह्यातील   मतदारांमध्ये वाढ होऊन ती ६, ७२, ०५३ एवढी  झाली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात  १८ ते २० वयामधील  मतदारांची  नाव नोंदणी कमी असून या गटातील मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे. या वयोगटातील  तरुण नोकरी व शिक्षणासाठी स्थलांतरित होत असल्यामुळे या गटातील मतदान नोंदणी कमी असल्याचे चित्र आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया कायम सुरू राहणारी प्रक्रिया असून  जास्तीत जास्त मतदारांनी  मतदान नोंदणी करावी  असे आवाहन सिंधुदुर्गचे निवासी उपजिल्हाधिकारी  मच्छिंद्र सुकटे  व निवडणूक उपजिल्हाधिकारी   बालाजी शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केले 

जिल्ह्यातील कणकवली कुडाळ व सावंतवाडी या तीन विधानसभा  मतदार संघातील मतदान निवडणूक यादी अद्यावत करण्यात आली.  आजच्या दिनांकाला ही यादी अंतिम असली तरी मतदार नोंदणीची प्रक्रिया  कायम सुरू राहणारी प्रक्रिया आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणी करणाऱ्या  व अंतिम यादीत येणाऱ्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क असणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकी वेळी  या तीनही मतदार संघात ६, ६४,५६६ एवढे मतदार होते. या मतदारांमधून  आजच्या दिनांक पर्यंत ४, ६६६    पुरुष व ७३०६ स्त्रिया मतदारांची वाढ झाली आहे. तर ३१७४ पुरुष व ३७९६  स्त्रिया काही कारणामुळे वगळण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण मतदार यादीत ६,९७० मतदारांची वाढ झाली आहे.

विधानसभा मतदार संघाच्या आकडेवारीनुसार आता  कणकवली विधानसभा मतदारसंघात  एक लाख 13 हजार 482 पुरुष व एक लाख 16 हजार 61  महिला  व एक तृतीयपंथी  मिळून दोन लाख 29 हजार 544 मतदार झाले आहेत. कुडाळ विधानसभा मतदारसंघात  एक लाख 7 हजार  201  पुरुष व एक लाख 8 हजार 282  महिला  मिळून 2 लाख 15 हजार 483 एकूण मतदार झाले आहेत. व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात  एक लाख 13 हजार 507 पुरुष व एक लाख 13 हजार 519 महिला मतदार मिळून दोन लाख 27 हजार 26  एकूण मतदार झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरुष मतदारांशी संख्या  तीन लाख 34 हजार 190  महिला मतदारांची संख्या तीन लाख 37 हजार 862 व एक तृतीयपंथी मतदार  मिळवून  जिल्ह्यात एकूण मतदान सहा लाख 72 हजार 53  एवढे झाले आहेत. 

शंभरी पार केलेले ५०४ मतदार 

या मतदार यादी मध्ये शंभरी पार केलेले 504 मतदार असून 80 वर्षे वयावरील 24880 मतदार आहेत. आपल्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार  18 ते 20  वयोगटातील सुमारे 31 हजार मतदार असणे आवश्यक होते. मात्र शिक्षण व नोकरी निमित्त   युवा मतदार स्थलांतरित होत असल्यामुळे  त्याचा मतदार नोंदणीवर परिणाम होताना दिसत आहे. 18 ते 19 वयोगटात 10,471 20 ते 29 वयोगटात  एक लाख 11 हजार 166, 30 ते 39 वयोगटात  एक लाख 20 हजार 311, 40 ते 49 वयोगटात  एक लाख 41 हजार 69,  50 ते 59 वयोगटात एक लाख 27 हजार 386, 60 ते 69 वयोगटात  84 हजार 702, 70 ते 79  वयोगटात 52 हजार 78, अशी मतदार नोंदणी झाली आहे. फक्त युवा मतदार गटातील मतदार नोंदणी होणे आवश्यक असून लोकसंख्येच्या प्रमाणात ही नोंदणी कमी आहे. शाळा महाविद्यालय  या ठिकाणी  जनजागृती करण्याचे काम जिल्हा निवडणूक विभाग करीत आहे. युवा मतदारांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन  निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे   उपजिल्हा  निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी केले आहे.