भोसले इन्स्टिट्यूटच्या 6 विद्यार्थ्यांची बॉयन्सी कन्सल्टंट्स अँड इंजिनिअरिंग कंपनीत निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: April 13, 2026 15:44 PM
views 102  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सी कन्सल्टंट्स अँड इंजिनिअरिंग या जहाज डिझाईन क्षेत्रातील कंपनीत यशस्वी निवड झाली आहे. कॉलेजमध्ये आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यू दरम्यान ही निवड करण्यात आली. बॉयन्सी कन्सल्टंट्स ही मरीन इंजिनिअरिंग व शिप डिझाईन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून जहाजांचे डिझाईन, ऑफशोअर प्रोजेक्ट्स, थ्री-डी मॉडेलिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट तसेच जहाजांच्या दुरुस्ती व रूपांतरणाशी संबंधित सेवा पुरवते. भारतासोबतच कंपनीची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर असून अमेरिका, नॉर्वे, सिंगापूर आदी देशांतील प्रकल्पांसाठी कंपनी सेवा पुरवते.


या कॅम्पस ड्राइव्हमध्ये कंपनी प्रेझेंटेशन, लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यू अशा विविध टप्प्यांद्वारे निवड प्रक्रिया पार पडली. यात मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पैकी ६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. मुलाखतींचे यशस्वी नियोजन कॉलेजचे टीपीओ हेड मिलिंद देसाई, टीपीओ महेश पाटील व इलेक्ट्रीकल अधिव्याख्याता समित निर्मळकर यांनी केले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.