५१ वं राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन सावंतवाडीत

Edited by: विनायक गावस
Published on: February 06, 2024 14:09 PM
views 169  views

सावंतवाडी : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यामने ५१ वं राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन 2023-24  चे आयोजन 10 ते 14 फेब्रुवारी 2024  या कालावधीत जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

दरवर्षी राज्यस्तरीय प्रदर्शनाची जबाबदारी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याकडे दिली जाते. यावर्षी हे प्रदर्शन आयोजित करण्याची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्ह्याने घेतली आहे. सावंतवाडी येथे होणाऱ्या या बालवैज्ञानिक प्रदर्शनास राज्यभरतील मंडळी येणार आहेत. सावंतवाडीकरांनी त्यांचा पाहुणचार करावा असं आवाहन मंत्री. केसरकर यांनी केलं. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली देशातील इयत्ता 6 वी 12 वी (प्राथमिक-माध्यमिक) च्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पकता आणि विज्ञान आणि गणितातील नवनिर्मितीच्या वृत्तीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन हा या उपक्रमांचा एक भाग आहे.

ज्यामध्ये देशभरातील सर्व राज्यांमधून राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात निवड झालेल्या विद्यार्थ्यांमधील निवडक विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. राज्यस्तरीय प्रदर्शनाची सुरुवात ही तालुकास्तरापासून होते. तालुकास्तरावरील विजयी विद्यार्थी जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात आणि जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात विजयी झालेले विद्यार्थी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात सहभागी होत असतात.जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन 2023-24  चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्व लोकांसाठी प्रदर्शन कालावधीत खुले राहणार आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक विज्ञानप्रेमी यांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शानास भेट द्यावी असं आवाहन केलं आहे. याप्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, कल्पना बोडके, राजन पोकळे, नितीन सांडये, प्रतिक बांदेकर आदी उपस्थित होते.