
मुंबई:प्रबोधन गोरेगाव संस्थेचा ५१ वा वर्धापन दिन सोहळा प्रबोधन क्रीडा भवनच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा झाला.शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रबोधन गोरेगाव मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
प्रबोधन गोरेगाव या संस्थेची स्थापना ५०वर्षापुर्वी झाली.या संस्थेच्या माध्यमातून समाजहिताची अनेक कामे केली जातात.या संस्थेचा ५१ वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला.यावेळी या संस्थेचे संस्थापक तथा माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संस्थेच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. याप्रसंगी बोलताना श्री देसाई म्हणाले,प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या स्थापनेवेळी जे लोक होते तेच लोक आजही संस्थेच्या सोबत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. संस्थेने यशस्वीपणे सुवर्णमहोत्सवी वाटचाल केली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळेच संस्थेला विधायक उपक्रम राबवताना मोठे बळ मिळाले आहे.बाळासाहेबाच्या विचारांवरच ही संस्था चालत आहे ,असे मत सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर प्रबोधन गोरेगाव संस्थेचे अध्यक्ष नितीन शिंदे, कार्याध्यक्ष कैलास शिंदे, प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे, खजिनदार रमेश ईस्वलकर, सहकार्यवाह देविदास पवार, शरदचंद्र साळवी हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘मराठी बाणा’चे प्रमुख अशोक हांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदुला सावंत यांनी केले. ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाने सोहळय़ाची रंगत वाढवली.या कार्यक्रमाला प्रबोधन संस्थेचे हितचिंतक तसेच गोरेगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.