
सावंतवाडी : शहरातील सबनीसवाडा भागातील वरद अपार्टमेंट आणि नूतन गृहनिर्माण सहकारी संस्था अशा दोन इमारतीमधील एकूण चार बंद असलेले फ्लॅट व एक रो हाऊस अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री फोडले. वरद अपार्टमेंटमधील फ्लॅट मधील कपाटातील दहा हजाराची रोकड चोरट्याने लंपास केली. अन्य चोरीच्या प्रयत्नात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
याबाबत इन्फ्रान्स मार्टिन डिसोजा वय 58 रा.जुनाबाजार हिने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सावंतवाडी सबनीसवाडा येथे वरद अपार्टमेंट व नूतन गृहनिर्माण सहकारी संस्था या एकाच परिसरात आहेत. वरद अपार्टमेंट मधील एक व नुतन गृहनिर्माण सहकारी उपस्थिती त एकूण तीन असे चार फ्लॅट चोरट्याने फोडले याच परिसरात असलेला एक रो हाऊसही चोरट्याने लक्ष केला. परंतु चोरट्यांच्या हाती दहा हजार रुपयांपलीकडे काहीच लागले नाही. वरद अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर पॅटर्सन डिसोजा यांच्या नावावर फ्लॅट आहे. पॅटर्सन हा कामानिमित्त मुंबई येथे असल्याने हा फ्लॅट बंदच असतो. परंतु आई इन्फ्रान्स व वडील मार्टिन डिसोजा हे नेहमी देखरेख करण्याकरता त्या ठिकाणी जाऊन येऊन असतात. चोरीच्या प्रकारानंतर त्यांनीही पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञाता विरोधात तक्रार दिली. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहरात चोरीचे प्रकार सुरू झाल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.