३८ लाखांची गोवा बनवटाची दारू पकडली !

एकावर गुन्हा दाखल
Edited by: देवयानी वरसकर
Published on: March 04, 2024 13:58 PM
views 672  views

सिंधुदुर्गनगरी : गोवा बनावटीची दारु वाहतूक करताना आयशर टेम्पो पकडुन ३८ लाख ४३ हजार ६०० रुपयांची दारू ओरोस खर्येवाडी येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पकडली आहे. तसेच एकाला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

   आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ही निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी याकरीता जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी इंत्यभूत माहिती संकलित करुन त्यांचेविरुध्द परिणामकारक कारवाई करणेबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी सर्व पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अवैध धंदे करणा-यांविरुध्द कडक कारवाई करणेसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात आलेले आहे.

     नियुक्त केलेल्या या विशेष पथकास 4 मार्च 2024 रोजी आयशर टेम्पो क्रमांक MH-07-AJ-6059 मधून गोवा बनावटीच्या दारुची गोवा-मुंबई हायवेने वाहतूक होणार असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांचे नेतृत्वाखाली गोवा ते मुंबई जाणारे महामार्गावर ओरोस, खर्येवाडी येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सकाळी 10:35 वाजताचे दरम्याने आयशर टेम्पो क्र. MH-07-AJ-6059 हा गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. हा टेम्पो थांबवून चालक व टेम्पोचे हौद्यामधील मालाची खात्री केली असता टेम्पोमध्ये गोवा बनावटीच्या दारुने भरलेले 828 पुठ्याचे बॉक्समध्ये अडतीस लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु व 15 लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा मिळून एकूण त्रेपन्न लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

     टेम्पोवरील चालक हा आपले ताब्यातील आयशर टेम्पो क्र. MH-07-AJ-6059 मधून बिगर परवाना गोवा बनावटीची दारु वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्याचे विरुध्द सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्ह्याचा पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणेकडून करण्यात येत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, पोलीस अंमलदार लक्ष्मण साळुंके, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, बस्त्याव डिसोजा, अमित तेली, चंद्रकांत पालकर, जयेश सरमळकर, चंद्रहास नार्वेकर, यशवंत आरमारकर यांनी केलेली आहे.