
सावंतवाडी : कबड्डी खेळाडूंच्या ठाणे येथे येत्या १९ मार्च रोजी होणाऱ्या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगे व मुलींचे ३८ संघ सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग कबड्डी असोसिएशन व हौशी कबड्डी संघांच्या संयुक्त बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे येथे ५०० ते ६०० खेळाडू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जिल्ह्यातील हौशी कमिटी संघटना, आयोजक, पंच राष्ट्रीय खेळाडू, जेष्ठ खेळाडू आणि जिल्ह्यातील सुमारे 26 हून अधिक मंडळे आमच्या सोबत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, सचिव विकास केरकर, जावेद शेख, हौशी कबड्डी संघांचे अजय जाधव, कृष्णा सावंत आदींनी माहिती दिली. यावेळी अनिल हळदिवे, नंदन वेंगुर्लेकर, जितेंद्र म्हापसेकर, दिनानाथ बांदेकर, भूषण राणे, नरेश डोंगरे, सुरज गावडे, महेश डिचोलकर,उदय यादव आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील ३० वर्षांचा कबड्डी खेळाडूंचा इतिहास आहे. राष्ट्रीय व राज्य पंच यांच्यासह खेळाडूंनी आपले नावलौकिक निर्माण केला आहे. मात्र गेल्या काही वर्षात कबड्डी असोसिएशन आणि फेडरेशन मधील वादा मध्ये कबड्डी खेळाडूंचे यश रोखले गेले होते. मात्र आता हौशी कबड्डी असोसिएशनने पुढाकार घेऊन सोनुर्ली येथे निवड चाचणी करत ठाणे येथील होणाऱ्या स्पर्धेत हौशी कबड्डी संघटनेच्या माध्यमातून कबड्डी असोसिएशनने खेळाडू पाठवावे असा निर्णय झाला त्यामुळे जवळपास ५०० ते ६०० खेळाडू ठाणे येथे १९ मार्च रोजी जातील ठाणे येथे खेळणाऱ्या संघामध्ये मुलगे व मुलींचा संघ आहे. या संघात २६ संघ मुलगे व १२ संघ मुलींचे असतील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान दुसऱ्या संघटनेच्या माध्यमातून मुलीला धमकी देण्याचा देखील प्रकार घडला मात्र आता खेळाडूंच्या यशस्वीतेसाठी लक्ष दिले जाणार आहे. धमकीला भीक घातली जाणार नसल्याचे अजय जाधव, विकास केरकर, प्रसाद अरविंदेकर यांनी सांगितले. कबड्डी असोसिएशन च्या माध्यमातून खेळाडू जात आहेत. मात्र महाराष्ट्र राज्य संघटनेचा कारभार प्रशासक सांभाळत आहे, त्याचा फटका आम्हाला बसला आहे असे श्री.केरकर यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० ते ३२ कबड्डी मंडळे आहे त्यातील २६ मंडळांनी सोनुर्ली येथे झालेल्या निवड चाचणीत सहभाग घेतला असे विकास केरकर यांनी सांगितले. मागील तीस वर्षांच्या कबड्डीच्या यशस्वी वाटचालीमध्ये आता पुन्हा एकदा नव्या दमाने सुरुवात केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.