
सिंधुदुर्ग : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत भ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय लोक अदालतीसाठी सर्व तालुका न्यायालयात प्रत्येकी एक पॅनेल तसेच जिल्हा न्यायालयात दोन पॅनेल नेमण्यात आले होते. पॅनेल क्र.१ मध्ये व्ही. एस. देशमुख, जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग व विधीज्ञ मेधा रविंद्र परब यांनी काम पाहिले. पॅनेल क्र.२ मध्ये व्हि. आर. जांभुळे, दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग व विधीज्ञ दत्तात्रय रामचंद्र देसाई यांनी काम पाहिले. संपूर्णा के. कारंडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग राष्ट्रीय लोक अदालतीसाठी उपस्थित होत्या. या पॅनेल समोर दिवाणी दावे, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, धनादेशाबाबतची प्रकरणे, कर्ज वसुली प्रकरणे व सर्व प्रकारची वादपुर्व प्रकरणे तडजोड होऊन निकाली झाली.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पक्षकार व विधीज्ञ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सदर राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांनी सुमारे दोन महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग घेतला होता.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ३१५ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली. सदर प्रकरणातील एकूण तडजोडीची रक्कम रुपये ४५६३८२४१/- अशी आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये समजोता होऊन निकाल झाल्याने त्यांचेतील सामंजस्य व जिव्हाळा टिकून राहिला आहे. तसेच सदर तडजोडीच्या निकालांविरुध्द अपील होत नसल्याने त्यांच्या वेळेची व पैशाची बचत झाली आहे.