MKCL चे ३१ व्यावसायीक अभ्यासक्रम माधवराव पवार विद्यालयात...!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 15, 2022 12:34 PM
views 177  views

वैभववाडी : शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्याना व्यावसायीक अभ्यासक्रम शिकता आला पाहिजे या हेतुने महालक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाने एमकेसीएलचे तब्बल ३१ व्यावसायीक अभ्यासक्रम माधवराव पवार विद्यालयात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.या व्यावसायीक शिक्षण केंद्रांचे उद्घाटन १५ ऑगस्टला होणार असल्याची माहीती शिक्षण संस्थेचे सचिव जर्नादन नारकर यांनी येथे दिली.

कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाली,यावेळी संस्थेचे खजिनदार नंदकुमार आम्रसकर,संचालक रवींद्र नारकर,मुख्याध्यापक विनोद गोखले,पर्यवेक्षक शिवदास कदम आदी उपस्थित होते.
श्री.नारकर म्हणाले दहावी,बारावी,पदवीपर्यतचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर आपल्या शाळेतील विद्यार्थी कोणती नोकरी करतात,कोणता व्यवसाय करतात याचे सर्व्हेक्षण संस्थेच्या माध्यमातुन आम्ही गेली पाच वर्ष करीत होतो.प्रतिनिधीक स्वरूपात शाळेत शिक्षण पुर्ण केलेल्या २८९ विद्यार्थ्याचे सर्व्हेक्षण आम्ही केले.

या सर्वेक्षणातुन धक्कादायक माहीती पुढे आली.१० टक्के विद्यार्थी आपले करियर आपण निश्चित केलेल्या क्षेत्रात करताना आढळुन आले.व्यावसायीक शिक्षण न मिळाल्यामुळे उर्वरित ९० टक्के विद्यार्थी मिळेल ती नोकरी करीत असल्याची बाब सर्वेक्षणातुन समोर आली आहे.या गंभीर विषयावर महालक्ष्मी शिक्षण संस्था कार्यकारिणीच्या सभांमध्ये अनेकदा सखोल चर्चा करण्यात आली.त्यातुनच शालेय शिक्षण देतानाच विद्यार्थ्याना त्यांच्या आवडीनुसार व्यावसायीक शिक्षण देणे क्रमप्राप्त आहे यावर सर्वाचे एकमत झाले.त्यानुसार गेले वर्षभर आम्ही व्यावसायीक शिक्षणात अग्रेसर असलेल्या आणि शासनमान्य असलेल्या (एमकेसीएल)महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड या संस्थेचे केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील करीत होतो.त्यात आम्हाला यश आले असुन हे केंद्र सुरू करण्यास आम्हाला मान्यता मिळाली आहे.उद्या ता.१५ ऑगस्टला स्वातंच्या अमृतमहोत्सवी वर्षी या व्यावसायीक अभ्यासक्रमाचे उद्घाटन तहसिलदार रामदास झळके यांच्या हस्ते होणार आहे.

ते म्हणाले पाचवीपासुन विद्यार्थ्याना या अभ्यासक्रम शिकविले जाणार असुन आठवी,नववीपर्यत शिक्षण घेणारा विद्यार्थी त्या त्या अभ्यासक्रमाचे पुर्ण शिक्षण घेवु शकेल.दहावी,बारावी आणि पदवीनंतर त्याला तत्काळ त्याच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी करण्याची संधी या अभ्यासक्रमामुळे प्राप्त होणार आहे.सुरू करण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमामध्ये ३१ अभ्यासक्रम आहेत यामध्ये अकांऊटींग,डिजीटल आर्ट,डिजीटल फ्रीलासींग,डिझायनिंग,प्रोग्रामींग,हार्डवेअर आणि नेटवर्कींग,न्यु कलर जॉब,मॅनेंजमेंट यासह विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे.शाळेतील विद्यार्थ्यासह तालुक्यातील सर्वसामान्यांना देखील या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येणार आहे.
१५ ऑगस्टला दहा वाजता होणाऱ्या या उद्घाटन कार्यक्रमासाठी तालुक्यातील विद्यार्थ्यानी उपस्थित राहावे असे आवाहन देखील श्री.नारकर यांनी केले आहे.