सिंधुदुर्गचा विकास आराखडा पुढच्या वर्षी ३०० कोटींचा होणार

पालकमंत्र्यांचा विश्वास
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 12, 2024 06:14 AM
views 373  views

कणकवली : कणकवली पर्यटन महोत्सव हा जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आराखडा पुढच्या वर्षी ३०० कोटींचा होईल. तर पाणबुडी प्रकल्प हा वेंगुर्ले येथेच होणार आहे. केंद्रीमंत्री नारायण राणे यांनी सुरु केलेली सिंधुदुर्ग पर्यटन विकासाची संकल्‍पना आम्‍ही वृद्धींगत करू अशी ग्‍वाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

कणकवली पर्यटन महोत्सवाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने थाटात उद्घाटन झाले. यावेळी श्रीफळ जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या श्रीफळ वाढवण्यात आले. त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतीशबाजी करण्यात आली. सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री.चव्हाण यांनी यावेळी कणकवलीच्या विकासासाठी यापुढेही भरघोस निधी देणार असल्‍याची ग्‍वाही दिली. तर कणकवली आणि जानवली गावांना जोडणाऱ्या पुलासाठी ८ कोटींचा निधी मंजूर झाला असल्‍याची माहिती दिली. अयोध्या येथे २२ जानेवारीला भव्य असे श्रीरामाचे मंदिर तयार होत आहे. सर्वांनी २२ जानेवारी सोहळ्या दिवशी घरात पणत्या, दीवे लाऊन दिवाळी साजरी करायचे आहे. पाचशे वर्षानंतर हा योग आला आहे. या योगाचा लाभ हिंदूंनी जरूर घ्यावा असेही ते म्‍हणाले.

आमदार नितेश राणे म्‍हणाले की, कणकवली शहरातील नागरिकांचे आनंदाचे काही दिवस जावेत, या हेतूने हा महोत्सव सुरु केला आहे. मुंबई आणि मोठ्या शहराप्रमाणे या ठिकाणी लोकांना मनोरंजन व्हावे, या साठी हा महोत्सव आहे. आता प्रशासक आहे तरीही आम्ही सुरु केलेली प्रथा आम्ही चालू ठेवली आहे. कणकवलीतील लोकांमुळे आम्ही शहराची सत्ता मिळवली आहे. राणे आणि जनतेच नात आजही घट्ट आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर निधीची कमतरता नाही. मागण्यापेक्षाही निधी देण्याचे काम ना. रवींद्र चव्हाण करीत आहेत. कुठलाच प्रश्न मागे ठेवला नाही.

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्‍हणाले की, सत्ता असो किंवा नसो जनतेचे काम करत राहायचे, राणेंची शिकवण आहे. त्यानुसार आमदार नितेश राणेंनी आम्हाला सांगितले, की पर्यटन महोत्सव याही वर्षी जोमाने करा. त्यामुळे राणेंचे कणकवलीकरानी आभार मानले पाहिजेत. कणकवलीत गोवा राज्‍याच्या धर्तीवर कला अकादमी झाली तर स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळेल. ती मागणी पालकमंत्री आणि आमदारांनी पूर्ण करावी. अशी मागणी देखील माझी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली