
मालवण : मालवण तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी एकूण १८२ तर सदस्य पदासाठी एकूण ८४८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी ५ डिसेंबर रोजी अर्ज छाननी होणार असून ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे अशी माहिती प्रभारी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी आनंद मालवणकर यांनी दिली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवारांनी पंचायत समिती येथे गर्दी केली होती. सुरुवातीला ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत होते. मात्र, ऑनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणी येत होत्या. अखेर राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज शुक्रवारी उमेदवारांनी पंचायत समिती येथे गर्दी केली होती.
या ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध :
घुमडे, शिरवंडे, कातवड, कोईल, काळसे, आंबडोस, पळसंब, आंबेरी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.