
ओरोस : गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात साथरोगाचा फैलाव होवू नये यासाठी १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन, बस स्थानके व चेक पोस्ट असलेल्या १८ ठिकाणी वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने कामानिमित्त जिल्ह्याबाहेर राहत असतात. मुंबई, पुणे आदी शहरांत राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हे नागरिक गणेश चतुर्थी निमित्त जिल्ह्यात एस टी किंवा रेल्वेने जिल्ह्यात दाखल होत असतात. मात्र, हे नागरिक ज्या शहरात कामानिमित्त राहत असतात. त्या ठिकाणी सुरु असलेला साथरोग त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात येवू शकतो. त्यामुळे खबरदारी १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत ही पथके नियुक्त करण्यात आली आहेत, असे डॉ. सई धुरी यांनी सांगितले.
कणकवली, सावंतवाडी, वैभववाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग या रेल्वे स्टेशनवर, मालवण, वेंगुर्ला, बांदा, कणकवली, देवगड, सावंतवाडी, कुडाळ बस स्थानक आणि आंबोली, फोंडाघाट, खारेपाटण, करूळ, इन्सुली, दोडामार्ग चेकपोस्ट अशा एकूण १८ ठिकाणी ही पथके कार्यरत राहणार आहेत. पहाटे ८ ते दु. २, दु. २ ते रात्रो ८ अशा दोन सत्रात १५ सप्टेंबर पासून आरोग्य पथके कार्यरत राहणार आहेत तर रेल्वे स्टेशन वरील पथके की रेल्वे गाड्यांच्या वेळेनुसार तैनात असणार आहेत अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली.