तिलारीच्या पाण्यासाठी माटणे जिल्हा परिषद मतदार संघातील १३ गावे उभारणार मोठा लढा

माजी उपसभापती बाळा नाईक यांनी केला एल्गार ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सोडविणार जिव्हाळ्याचा प्रश्न
Edited by: संदीप देसाई
Published on: February 22, 2023 17:12 PM
views 287  views

दोडामार्ग : 'पाणी आहे उशाशी, जनता मात्र उपाशी, अशी अवस्था तिलारी धरणात अमाप पाणीसाठा असूनही दोडामार्ग तालुक्यातील १४ गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना अनुभवावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे धडाडीचे नेतृत्व व माजी उपसभापती बाळा नाईक यांनी आता या १४ गावांच्या माटणे जिल्हा परिषद मतदार संघाला हक्काचे तिलारीचे पाणी मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी बुधवारी मतदार संघातील सर्व सरपंचांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणत 'माटणे मतदार संघातील प्रत्येक गावात तीलारीचे पाणी' या लढ्याचा एल्गार केला आहे.  कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन वर्षात या तिलारीचे पाणी या गावांना मंत्री रवींद्र चव्हाण व दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मिळवून देणारच. त्यासाठी गाव ते मंत्रालय असा वाटेल तो लढा उभारण्याची आपली तयारी असल्याचे दोडामार्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ठणकावलं  आहे.

या पत्रकार परिषदेला त्यांच्यासमवेत झरेबांबर आंबेली सरपंच अनिल शेटकर, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, कुडासे खुर्द सरपंच सौ. संगिता देसाई, वझरे गिरोडे सरपंच सुरेश गवस, माटणे सरपंच महादेव गवस, तळेखोल सरपंच वंदना सावंत, उसप माजी सरपंच दिनेश नाईक, तळेखोल उपसरपंच महादेव नाईक, उसप ग्रामस्थ सुनिल गवस आदि उपस्थित होते. पिकुळे सरपंच आपा गवसयांनी पाठींबा दिला आहे.


यावेळी बाळा नाईक यांनी शासनाच्या व जलसंपदा विभागच्या धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या भूमी पुत्रांनी धरण व पाण्यासाठी त्याग केला त्याच गावांना पाण्यासाठी वंचित ठेवले जाते याउलट मालवणपर्यंत तिलारीचे पाणी नेले जाते. मुळात माटणे जि.प. मतदार संघातील खोक्रल, उसप, पिकुळे, झरेबांबर, आयनोडे सरगवे व पाल पुनर्वसन, आंबेली, वझरे - गिरोडे, आंबडगाव, माटणे, आयी, तळेखोल, विर्डी या गावांचा लाभ क्षेत्रात समावेश नसल्याचे आज सांगितले जाते, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे यापूर्वी ज्या घोषणा झाल्या, आश्वासने दिली त्यावर न बोलता या जि.प. मतदार संघातील १४ गावांचा तिलारी धरणाच्या लाभ क्षेत्रात समावेश करून तिलारी कालव्याच्या पाण्यावर लिफ्ट सिस्टिम योजना राबवून त्या गावांना जलसंपदा विभागाने पाणी द्यावे यासाठी आपला लढा राहणार असल्याचे बाळा नाईक यांनी संगितले आहे.


पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने वाटेल ती लढाई करून हा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सज्ज झालो असून या मतदार संघातील सर्व लोकप्रतिनिधी व राजकीय नेते यांनी सर्व मतभेत विसरून कोणतेही राजकारण न करता या लढ्यात सहभागी व्हावे. सुरवातीला ही सर्व गावे लाभक्षेत्रात गावे आणून आपण संघटित लढा उभारू आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळची अशी ही आपली नेतृत्व आहेत. म्हणूनच आम्ही जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व सरपंच, उपसरपंच आणि सर्वपक्षीय मंडळी, महिला, युवक, तरुण, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते यांना याप्रश्नी सहकार्य करावे असे आवाहन बाळा नाईक यांनी केल आहे. या लढ्याची सुरवात कृती समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकजूट दाखविल्यास गेली कित्येक वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला. 

मागे काय झाल यावर बोलणार नाही.

२००४ पासून तिलारी धरणात पाणी साठा सुरू झाला, मात्र २० वर्षे हा प्रश्न का सुटला नाही, असा प्रश्न नाईक यांना विचारला असता ते म्हणाले, आपण मागे कोणी काय केल यावर आपण बोलणार नाही. १९९६ पासून या मतदार संघात तिलारीच पाणी याव यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र रिजल्ड मिळाला नाही, अर्थात यासाठी आम्ही कोणाला दोष देणार नाही, आम्हीच पाठपुरवा करण्यात कुठे तरी कमी पडलो. आता मात्र आम्ही टोकाचा लढा देणार असून हा प्रश्न सुटावा यासाठी कोणत्याही थराला जाऊन लढा देण्यासाठी आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. 

त्याग करणाऱ्यांना पाणी मिळायलाच हव - सौ. संगीता देसाई, सरपंच-कुडासे खुर्द 

ज्या लोकांनी पाण्यासाठी त्याग केला त्या आयनोडे-सरगवे व पाल पुनर्वसन मधील गावांना सुद्धा आज संघर्ष करावा लागतोय, त्यामुळे हा लढा अत्यंत गरजेचा असून आपण नाईक यांच्यासोबत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र आलच पाहिजे - अनिल शेटकर, सरपंच-झरेबांबर

स्वेछा पुनर्वसन घेतलेले ५० टक्के तिलारी प्रकलपग्रस्तच माटणे मतदार संघातील शेतकरी ग्रामस्थ आहेत. त्यांनाही आज पाणी पाणी कारव लागतय. आज शासन हर घर जल अभियान राबवित आहे. मात्र गावात पाणीच उपलब्ध नसेल तर शेतीला पाणी दूरच राहील पिण्यासाठी गावकरी मंडळी यांना पाणी द्यायचे कुठून हा प्रश्न आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलच पाहिजे. तिलारीचे पाणी ही आमच्या गावची व जि.प. मतदार संघाची अत्यंत गरज असून या लढ्यात आम्ही तर शेवटपर्यंत सोबत राहणार आहोत. 

पाणी आल तरच भूमिपुत्रांच्या जमिनी वाचतील- सुरेश गवस, सरपंच- वझरे-गिरोडे 

वझरे-गिरोडे गावे पाण्यासाठी तहानलेली असल्याने येथील भूमिपुत्र आपल्या लाखमोलच्या जमिनी कवडीमोलने परप्रांतीय आणि गोयकर लोकांना विकत आहेत. पाणीच नाही तर ओसाड जमिनी ठेऊन करायचं काय या मानसिकतेनेन जमिनी विकल्या जात आहेत. मात्र याउलट गावात बारमाही पाणी आल्यास भूमिपुत्रांच्या जमिनी वाचतील, असा विश्वास सरपंच सुरेश गवस यांनी व्यक्त केला. 

पाण्यासाठी लोकांची वणवण थांबावी - वंदना सावंत, तळेखोल – सरपंच

अजून उन्हाळा सुरू झाला नाही तरी पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. पाणी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने आणि आम्हाला तिलारीचे पाणी हव असल्याने हा लढा आम्ही यशस्वी करण्यासाठी वाटेल ती किमंत मोजायला तयार आहोत. जेणेकरून हा लढा यशस्वी करून आम्ही तळेखोल, माटणे, आंबडगाव, वझरे, आयी या गावांना तिलारीचे पाणी मिळेल.