
सावंतवाडी : यशवंतराव भोसले फार्मसीच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागामार्फत सिप्ला लिमिटेड, गोवा यांच्यासह औषध निर्मिती व औषधसंबधी सेवा क्षेत्रात अग्रेसर अशा अन्य चार विविध औषध कंपनी यांच्या सहकार्याने २२ मार्च २०२५ ते ०८ एप्रिल २०२५ या कालावधीत विविध कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आले होते.
महाविद्यालयात सिप्ला सोबत अँटीला हेल्थकेअर, सीएमएस पॉलीक्लिनिक, वेलनेस फॉरेव्हर, वुई केअर, गोवा अशा विविध नामांकित कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह करिता प्रत्यक्ष भेट देऊन मुलाखतीचे नियोजन केले होते. या विविध मुलाखती मधून महाविद्यालयातील एकूण १२५ पदवी व पदविकाधारक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेले विद्यार्थी प्रामुख्याने गोवा व मुंबई या ठिकाणी काम करणार आहेत.
या प्रक्रियेत अत्यंत विशेषबाब म्हणजे भारतातील अग्रनामांकित औषधनिर्माण कंपनी सिप्ला लिमिटेड, गोवा यांच्याकडून भोसले फार्मसी कॉलेजच्या ५७ नवोदित फार्मसिस्टची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कॉलेज प्रशासनाने दिली. मागील तीन वर्ष ते आजपर्यंत सिप्ला कंपनीने १८० हून अधिक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यशस्वी निवड केली आहे. यासोबत अँटीला हेल्थकेअर मध्ये २०, सीएमएस पॉलीक्लिनिक मध्ये ०९, वेलनेस फॉरेव्हर मध्ये २०, वुई केअर फार्मसी यांचेकडे १९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये डी. फार्मसी व बी. फार्मसी अशा दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांची अंतिम निकालाच्या आधीच प्लेसमेंटच्या माध्यमातून निवड झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व समाधान व्यक्त होत आहे.
यशवंतराव भोसले कॉलेजने औद्योगिक क्षेत्राशी विकसित केलेल्या सकारात्मक आणि व्यावसायिक संबंधांमुळे ही संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली. उद्योगजगतात कॉलेजने निर्माण केलेल्या भक्कम विश्वास संबंधांमुळे आजपर्यंत विविध कंपनीमार्फत ५०० हून अधिक गुणवत्ताधारक प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांच्या नॅक मान्यतेसह, यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजने उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार अभ्यासक्रमात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योग-व्यावसायाभिमुख दृष्टीकोन वाढीस लागण्यास मदत होत आहे. परिणामी, आघाडीच्या औषधनिर्मिती कंपन्यांना प्रशिक्षित, कार्यकुशल आणि नोकरीसाठी कार्यतत्पर उमेदवार मिळत आहेत. मागील काही वर्षांत अनेक प्रशिक्षणार्थींना स्थायी नोकरी मिळाली आहे.
तसेच विद्यार्थ्यांना मिळालेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडीचे कार्याध्यक्ष श्री. अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा सौ. अस्मिता सावंत भोसले, सचिव श्री. संजीव देसाई, प्रशासकीय समन्वयक सौ. सुनेत्रा फाटक यांच्यासह सर्व पालक व भागधारक यांनी अभिनंदन केले आहे. हे विविध कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यासाठी बी. फार्मसी प्राचार्य डॉ. विजय जगताप व डी. फार्मसी प्राचार्य श्री. सत्यजित साठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व त्यांनी सर्व यशस्वीतांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वी होण्यासाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. नमिता भोसले व त्यांचे सहकारी प्रा. प्रिया यादव व प्रा. भाग्यश्री हळदणकर मेहनत घेत आहेत.