
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी परीक्षेचा निकाल परवा म्हणजेच, २७ मे २०२४ रोजी जाहीर होणार आहे. मंडळामार्फत 10th Standard March 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल परवा, सोमवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची आतुरता होती. मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या.बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेचा निकाल ४ जून पर्यंत लागणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानंतर, मात्र शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेतील विधानामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन चर्चेला उधाण आले होते. मात्र, MSBSHSE बोर्डाच्या वतीने आज निकालाच्या तारखेबद्दल अधिकृत सूचना जाहीर झाल्यानंतर सगळ्या चर्चाना आता पूर्णविराम लागला आहे. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळविलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. परवा, सोमवार दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता १० वी बोर्ड परीक्षांचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहेत.