सावंतवाडी : दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व उपचारासाठी लाखो रुपयांची गरज असलेल्या एका महिलेच्या मदतीकरिता व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून आवाहन करीत सुमारे एक लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. कलंबिस्त येथील युवकांनी याबाबत पुढाकार घेऊन मदतीसाठीची ही रक्कम उभी केली आहे.
सध्या मोबाईलचा जमाना आहे. व्हाॅट्सअॅप, फेसबुक, इंस्टाच्या आहारी गेलेली आजची पिढी सामाजिक क्षेत्रापासून मात्र दूर जात असल्याची ओरड नेहमी केली जाते. मात्र, याच पिढीने सोशल मीडियाचा उपयोग करून महिलेच्या उपचाराकरिता उचललेले पाऊल निश्चितच स्तुत्य असल्याचे आता समाज माध्यमातून बोलले जात आहे.
कलंबिस्त येथील भिकाजी सखाराम सावंत यांची पत्नी लक्ष्मी सावंत ही महिला गेल्या दीड-दोन वर्षापासून दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. सध्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. भिकाजी यांनी आपल्या पत्नीच्या आजारासाठी लाखो रुपये खर्च केले. पण दिवसेंदिवस उपचाराचा खर्च वाढतच असल्यामुळे आता परिस्थितीपुढे हात टेकलेल्या व पत्नीच्या उपचारासाठी कुणाकडे मदत मागायची या विवंचनेत असतानाच गावातील सामाजिक कार्यकर्ते रवीकमल सावंत, दीपक सावंत, दत्तात्रय सावंत यांनी गावातील युवा प्रतिष्ठान व स्वराज रक्षक युवक मंडळ व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मदतीची हाक दिली. हा हा म्हणता मदतीचा ओघ सुरू झाला. यातून काही कालावधीतच सुमारे एक लाख रुपये जमा झाले.
कलंबिस्त हे गाव सैनिकी परंपरेचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील लोकात दातृत्व अंगी आहे. याची प्रचितीही या घटनेने करून दिली आहे. केवळ गावातीलच नाही तर मुंबई पुणे आदी भागातील अनेकांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाईन आर्थिक मदत केली आहे.
या आर्थिक मदतीसाठी गावचे माजी सरपंच, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी अनंत सावंत, कृष्णा सावंत, रवी कमल सावंत, दीपक सावंत, दत्तात्रय सावंत, रवींद्र तावडे, सचिन सावंत, अमित सावंत, कलंबिस्त हायस्कूल संस्थेचे चंद्रकांत राणे, सामाजिक कार्यकर्ते बाळू गावडे मित्र मंडळ , सर्व वेर्ले ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला.
तसेच कलंबिस्त गावातील भजन मंडळे सहकारी संस्था आजी-माजी सैनिक मुंबई स्थित गावातील मंडळे यांनी आर्थिक मदतीच्या हाकेला ओ देत एका महिलेला जीवन मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी गाव एकवटला. युवकांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.