प्लास्टिकमुक्त चिपळूण मोहिमेत ‘होम मिनिस्टर’ खेळ व मानाच्या पैठणीचे सोमवारी बक्षीस वितरण

ना. सामंत, आ. निकम, अभिनेता ओंकार भोजने यांची उपस्थिती
Edited by: मनोज पवार
Published on: August 22, 2025 20:10 PM
views 28  views

चिपळूण :  सह्याद्री निसर्ग मित्र आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहकार्याने चिपळूण नगर परिषदेने आयोजित केलेल्या ‘प्लास्टिकमुक्त चिपळूण’ या जनजागृती मोहिमेअंतर्गत ‘होम मिनिस्टर’ खेळ, मानाची पैठणी आणि सोन्याची नथ यांसह भव्य बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे पार पडणार आहे.

या सोहळ्याला ना. उदय सामंत (उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री – रत्नागिरी) व श्री. शेखर निकम (आमदार, चिपळूण-संगमेश्वर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अभिनेता, चिपळूण नगर परिषदेच्या स्वच्छता दूत ओंकार भोजने हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतील.

कार्यक्रमात कूपनमधून निवडलेल्या लकी ड्रॉ विजेत्या महिलेला मानाची पैठणी प्रदान करण्यात येणार आहे. त्याच दिवशी विशेष ‘होम मिनिस्टर’ खेळाचे आयोजन असून अंतिम विजेती महिला सोन्याच्या नथीची मानकरी होईल. होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोककलावंत सुनील बेंडखळे करणार आहेत.याशिवाय ‘राखणदार’ या कचरा व प्लास्टिकमुक्तीवर आधारित जनजागृती करणाऱ्या शॉर्ट फिल्मचे प्रदर्शन हा कार्यक्रमातील एक विशेष आकर्षण ठरणार आहे.

या उपक्रमाद्वारे प्लास्टिकमुक्त चिपळूणसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे, पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश देणे आणि स्वच्छतेसाठी सक्रिय सहभागास प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली. महिलांनी प्लास्टिक दिल्यानंतर त्यांना कूपन देण्यात आली. आता सहभागी महिलांमधून लकी ड्रॉची व नदीची मानकरी ठरणार आहे.नगर परिषदेने नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त चिपळूणासाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे यांनी  केले आहे.