
कणकवली : देशाची प्रगती युवकांच्या हाती आहे. विद्यार्थी हा भारताचे भविष्य आणि भवितव्य आहे, असे प्रतिपादन कणकवली दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीक्ष एस.जी.लटुरिया यांनी केले. कणकवली तालुका विधी सेवा समितीवतीने आंतरराष्ट्रीय योग दिन व कायदेविषयक शिबिराचे माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत आयोजन करण्यात आले. याप्रसंगी न्या. लटुरिया बोलत होते. यावेळी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत, शालेय समिती चेअरमन श्री. आर.एच.सावंत, चंद्रशेखर वाळके, बावतीस घोन्सालवीस, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, मकरंद माने, श्री.कुंभार, एम.एम. आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.
न्या. लटुरिया म्हणाले, विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा. तंत्रज्ञानाच्या साह्याने नवीन काही शिकू शकतात व अधिकचे ज्ञान मिळवता येते. प्रत्येक एडिटिंग फोटोच्या पाठिमागे एक मेटा डेटा असतो, प्रत्येक सायबर गुन्ह्यात त्याचा तपास करता येतो.अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा क्षेत्रात करिअर करावे. शिस्त हा विद्यार्थी जीवनाचा अविभाज्य अंग आहे भविष्यात आपण काय होणार आहात याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. देशाची प्रगती ही युवकांच्या हाती आहे. त्यासाठी कायद्यांची कडक अंमलबजावणी केली जात आहे.
रवींद्र पन्हाळे म्हणाले, सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ तयार करणे, टाकणे, मुलींचा पाठलाग करणे,रस्ते वाहतुकीच्या नियमांचा भंग करणे, विना लायसन्स गाडी चालवणे हे सर्व कायद्याने गुन्हे आहेत. त्यासाठी पोलीस खाते सक्रिय आहेत. विद्यार्थी हा भारताचे भविष्य आणि भवितव्य आहे, शालेय जीवन हे आयुष्यभरासाठी असते. याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. युवाशक्ती व अणुशक्ती हा देशाचा आधार आहे, त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर केल्यास देशाचा विकास होईल, असे मत सतीश सावंत यांनी व्यक्त केले.
अॅड. मिलिंद सावंत यांनी रॅगिंग कायदा या विषयी जुजबी माहिती दिली. जागतिक युवा दिनानिमित्त अॅड. बेलवलकर यांनी २०२५ च्या जागतिक दिनाची थीम "सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि त्या पलीकडे स्थानिक युवा कृती" या विषयी करिअर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुमंत दळवी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रसाद मसुरकर यांनी केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.