
एस. एल. देसाई विद्यालय पाट, एन.ए. एस. डी. विद्यालय वालावल आणि न्यू इंग्लिश स्कूल, बोर्डवे ओसरगाव शाळेच्या माध्यमातून स्थानिक झाडांचे वृक्षारोपण, निसर्ग चित्रकला स्पर्धा आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाट तलाव, दाबाचीवाडी तलाव, वालावल तलाव आणि ओसरगाव तलाव या तिन्ही तलावांच्या परिसरात स्थानिक प्रजातींच्या २०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश पाणथळ परिसंस्थेचे संवर्धन, पक्ष्यांना योग्य अधिवास उपलब्ध करून देणे तसेच स्थानिक जैवविविधतेचे रक्षण करणे हा होता. या ठिकाणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला. पिंपळ, वड, उंबर, जांभुळ, कोकम, आंबा, यांसारखी स्थानिक झाडे लावण्यात आली. या वृक्षारोपणामुळे पाणथळ भागातील पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होणार आहे ही मोहीम, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ, महाराष्ट्र जैवविविधता मंडळ (जीन बँक), रोटरी क्लब, कुडाळ तसेच स्थानिक ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली.
तसेच एस.एल.देसाई विद्यालय पाट, एन.ए. एस. डी. विद्यालय वालावल आणि न्यू इंग्लिश स्कूल, बोर्डवे, ओसरगाव येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आणि निसर्गचित्र स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे जलप्रदूषण, रासायनिक रंगांचे दुष्परिणाम तसेच पाणथळ जागांचे संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगणे हा होता. तसेच गणेशोत्सवाच्या काळात निसर्गाचे रक्षण, पाण्याचे संवर्धन आणि पाणथळातील जैवविविधतेचे जतन करण्याबाबतही जनजागृती मुलांमध्ये करण्यात आली. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत तिन्ही शाळेतील जवळपास १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मातीची मूर्ती तयार करण्याची कला आत्मसात केली तसेच विद्यार्थ्यांनी शिल्पकलेसोबत पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संकल्प ही केला. निसर्गचित्र स्पर्धेत तब्बल २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या चित्रांतून वृक्षारोपण, जलसंधारण, पाणथळजागा संवर्धन, प्रदूषणमुक्त सण, प्लास्टिकविरहित वातावरण असे प्रभावी संदेश उमटले. निसर्गचित्र स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात डॉ. योगेश कोळी, श्री. प्रविण सावंत, मयुरी चव्हाण आणि प्रसाद गावडे यांनी नियोजन आणि समन्वय कौशल्यपूर्णरीत्या पार पाडले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, तसेच महाविद्यालयाची विध्यार्थिनी कु. मृणाल म्हस्के हिने बक्षिसांचे प्रयोजन केले व महाविद्यालयातील माजी विध्यार्थी श्री. निखील पाटकर यांनी मातीची मूर्ती तयार करण्याची कला शिकवली. सर्व शाळेतील शिक्षकवर्ग आणि स्थानिक संस्थां व मुख्याद्यापक यांचे विशेष सहकार्य लाभले. रोटरी क्लब, कुडाळ चे श्री. गजानन कांदळगावकर यांच्या मार्फत पाणथळ परिसरात वृक्षलागवडी साठी स्थानिक रोपांची सोय करण्यात आली.
मुलांशी संवाद साधताना पाणथळ जागा संवर्धन, जलस्रोतांचे रक्षण आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे फायदे अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी “माझा गणपती मातीचा गणपती” आणि “पाणथळ जागा माझा सखा” या ब्रीधवाक्यांचे अनुकरण करून मुलांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. विद्यार्थ्यांच्या सहभागातून दिलेला संदेश सर्वसामान्यांना प्रेरणा देऊन समाजात पर्यावरण जागरुकतेची चळवळ अधिक प्रभावीपणे बळकट होईल.