
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे सहा नगरसेवक निलंबित केल्याच्या निर्णयावरआमदार निलेश नारायण राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना राणे यांनी, 'भाजपमध्ये निर्णय हे खासदार श्री नारायण राणे घेत असतात. त्यामुळे सिंधुदुर्ग भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निलंबनाच्या पत्राला आम्ही किंमत देत नाही,' असे स्पष्ट केले.
नगरसेवकांचे निलंबन आणि राणे कुटुंबियांची नाराजी
भाजपच्या कुडाळमधील सहा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. 'ज्या दिवशी खासदार श्री नारायण राणे साहेब सांगतील, त्या दिवशीच निलंबन आम्हाला मान्य असेल,' असे त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्यावरून सिंधुदुर्ग भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
जिल्हा भाजपमधील नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाची राणे कुटुंबियांना कल्पना होती की नाही, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकारण अधिक तापले असून, भाजपमधील हे वाद येत्या काळात कोणत्या दिशेने जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.