
कणकवली : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील (एस.एस.पी.एम.) प्राध्यापकांनी जागतिक पातळीवरचा एक नवा शोध लावला आहे. फणसाच्या बियांपासून पर्यावरणास अनुकूल अशी 'स्मार्ट प्लास्टिक फिल्म' तयार करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
प्रा. डॉ. कल्पेश सुनील कांबळे (मुख्य संशोधक), प्रा. डॉ. सौरभ सदानंद कुलकर्णी व प्रा. भाग्यश्री अरावकर मॅडम (सहसंशोधक) यांनी प्रा. डॉ. नितिन महादेव शिवशरण (संशोधन प्रमुख) आणि प्राचार्य डॉ. दुरांदुंडी सावंत बाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शोधकार्य केले.
या संशोधनात फणसाच्या बियांतील स्टार्चमध्ये डाळिंबाच्या रसातील (पोमेग्रॅनेट ज्यूस) नैसर्गिक रंगद्रव्ये मिसळली आहेत. ही रंगद्रव्ये pH मूल्याप्रमाणे रंग बदलतात - ताजे खाद्य (pH >6) असताना फिल्म गुलाबी/जांभळी दिसते तर बिघडलेले खाद्य (pH <5) असताना फिल्म पिवळी/हिरवी होते. डाळिंबाच्या रसाचा वापर केल्यामुळे ही तंत्रज्ञान आणखी पर्यावरणास अनुकूल आणि कमी खर्चाची झाली आहे.
हे 100% नैसर्गिक व विघटनशील (4-8 आठ्यांत नष्ट होते) असून सामान्य प्लास्टिकपेक्षा 45% स्वस्त उत्पादन खर्चाचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना फणसाच्या बियांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल तर डाळिंबाच्या शेतकऱ्यांनाही नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल. खाद्य सुरक्षिततेत ही क्रांतिकारक तंत्रज्ञान सिद्ध होईल अशी अपेक्षा आहे.
डॉ. कांबळे म्हणाले, "डाळिंबाच्या रसाचा वापर केल्याने हे तंत्रज्ञान आणखी प्रभावी झाले आहे. आम्ही यासाठी पेटंट मिळविण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि या क्षेत्रात अधिक संशोधन करण्याची योजना आहे. तसेच यासाठी आम्ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून निधी मिळवण्याची योजना आखत आहोत.”
संस्थेच्या पुढील योजनांमध्ये यंत्रणेशी सहकार्य करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन, ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्य गटांना प्रशिक्षण देऊन लघु उद्योग सुरू करण्यास मदत, आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश यांचा समावेश आहे.
कोकण प्रदेशाच्या वैज्ञानिक संशोधनातील या ऐतिहासिक यशाचे संपूर्ण संस्थेच्या छात्र-छात्रांनी, शिक्षकवृंदाने या संशोधकांना अभिनंदन देत म्हटले आहे: "आमच्या प्राध्यापकांनी कोकणातील केलेल्या या शोधामुळे संस्थेचे नाव राष्ट्रीय स्तरावर गौरविले गेले आहे. हे केवळ त्यांचेच नव्हे तर संपूर्ण कोकण प्रदेशाचे अभिमानास्पद यश आहे!"
प्राचार्य डॉ. बाडकर यांनी सांगितले; "कोकणातील नैसर्गिक संपदा वापरून केलेले हे संशोधन 'व्होकल फॉर लोकल' या संकल्पनेचे जिवंत उदाहरण आहे. या संशोधनामुळे आमच्या संस्थेच्या छात्रांना प्रेरणा मिळेल. "
एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या व्यवस्थापनाने प्राध्यापकांना केलेल्या यशस्वी संशोधनाबद्दल सन्मान प्रदर्शित केला आहे.